आपत्ती : नेपाळमधील भूकंपाचा इशारा

आपत्ती : नेपाळमधील भूकंपाचा इशारा
Published on
Updated on

प्रा. विजया पंडित

नेपाळ हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे. 2023 मध्ये आतापर्यंत नेपाळला 70 भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या काही काळापासून जगाच्या विविध भागांत भूकंपामुळे होणार्‍या विध्वंसाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या आत कुठेतरी व्यापक उलथापालथ होण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळ त्याचे केंद्र ठरणार नाही ना?

अलीकडील काळात नेपाळ आणि भारताच्या उत्तरेकडील प्रांतात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने भूगर्भशास्त्रज्ञांत चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळला 5.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या भूकंपाने दीडशेहून अधिकजणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. हिमालयाच्या पायथ्याशी आणि लगतच्या परिसरात सतत भूकंप होण्यामागे निसर्गावरचे आक्रमण हे प्रमुख कारण आहे. याचा संबंध चीनशीही आहे. चीनने या गोष्टींचा विचार न करता तिबेटमध्ये प्रचंड विकासकामे सुरू केली आहेत. हा भाग इंडो ऑस्ट्रेलियन टेक्टॉनिक प्लेटवर असून तो भूकंपाच्या द़ृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो.

या महिन्याच्या प्रारंभी बसलेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सोमवारी सायंकाळी पुन्हा भूकंप झाल्याने नेपाळ अधिकच चिंतेत पडला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशातील अयोध्येपासून 233 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे होता. नेपाळची भौगोलिक स्थिती पाहता तेथील भूकंप हे भारतालाही हादरे देणारे आहेत. 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी'चे शास्त्रज्ञ संजयकुमार प्रजापती यांच्या मते, दोन दिवसांपूर्वीचा भूकंप हा 3 नोव्हेंबरच्या भूकंपाचा पुढचा धक्का आहे. वास्तविक गेल्या 8 दिवसांत तेथे आतापर्यंत 14 लहानसहान भूकंपाचे धक्के बसले. कोणताही मोठा भूकंप होताना लहानसहान भूकंप होतातच. पण त्यांची वारंवारिता अधिक असणे ही बाब चिंताजनक आहे.

या भूकंपावरून सध्या बर्‍याच शंका-कुशंका घेतल्या जात आहेत. 3 नोव्हेंबरला नेपाळला रिश्टर स्केलवर 6.4 एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप मुख्य होता आणि त्यानंतर बसणारे धक्के त्याचे परिणाम होते का, असा प्रश्नही विचारला जात आहे. वास्तविक भूकंपाचा अचूक अंदाज बांधणारे शास्त्र अद्याप विकसित झालेले नाही. दुर्दैवाने जाजरकोट येथे मनुष्यहानी अधिक झाली आणि त्यामुळे नेपाळमध्ये काळजीचे वातावरण आहे. नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने होत आहे आणि जर्जर इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. नेपाळी लोकांच्या मनात 2015 रोजीच्या भूकंपाची धास्ती आहे. त्या काळात 9 हजार जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा अनेक ऐतिहासिक स्थळांची पडझड झाली. दुर्मीळ वारसा नष्ट झाला होता.

दहा लाखांपेक्षा अधिक घरांची हानी झाली. त्यावेळी नेपाळला सुमारे 6 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. यावेळीदेखील बरेच नुकसान झाले असून त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. नेपाळमध्ये आता हिवाळा सुरू आहे. त्यामुळे चिंता अधिक आहे. भारताकडून नेपाळला सर्वतोपरी मदत होणे अपेक्षित आहे. अर्थात असे भूकंप कमी करता येणार नाही. मात्र त्यामुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. जगभरात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत दरवर्षी सरसरी 20 कोटीपेक्षा अधिक लोकांना फटका बसतो आणि दोन कोटी नागरिक बेघर होतात. दक्षिण आशियातील देशांनी तर अधिक खरबदारी घेणे गरजेचे आहे.

कारण हिमालयाच्या पायथ्याशी असणारा संपूर्ण भाग हा भूकंपाच्या द़ृष्टीने संवेदनशील आहे. त्यासाठी अशा भागात येणार्‍या नैसर्गिक संकटापासून बचाव करण्यासाठी वेगळी व्यवस्था करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही व्यवस्था जागतिक व्यासपीठावर एकत्र येऊन करता येणे शक्य आहे. आपत्तीच्या काळात दक्षिण अशियातील देश एकमेकांना मदत करतील, माहितीचे आदानप्रदान करतील, मदतसामग्री प्रदान करतील यासाठी सर्वसमावेशक व्यवस्था आणि आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या काळात सहकार्य करताना आपापसातील वाद बाजूला ठेवणे गरजेचे आहे. भारत यादृष्टीने पुढाकार घेऊ शकतो. अशा संकटापासून बाहेर पडण्यासाठी दक्षिण अशियातील देशांना आर्थिक सुधारणा या परस्पर आणि चांगल्या समन्वयातून कराव्या लागतील. या देशांत चांगले संबंध असणे गरजेचे आहे. अर्थात सतत बसणारे भूकंपाचे धक्के हे एखाद्या इशार्‍यापेक्षा कमी नाहीत, हे ध्यानात घेतले पाहिजे.

'पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट' अहवालानुसार, नेपाळ हा भूकंपाच्या बाबतीत जगातील 11 वा सर्वात धोकादायक देश आहे. पश्चिम नेपाळमध्ये आलेला ताजा भूकंप 2023 मध्ये होणार्‍या 70 भूकंपांपैकी एक आहे. नेपाळमधील राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ भरत कोईराला यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय आणि युरेशिया टेक्टोनिक प्लेट्समध्ये सतत टक्कर होत असते, ज्यामुळे भरपूर ऊर्जा निर्माण होते. नेपाळ या दोन प्लेट्सच्या सीमेवर असल्याने भूकंपांच्या दृष्टीने अतिक्रियाशील भागात आहे. त्यामुळे पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या भूकंपाचा धोका आहे. गेल्या 520 वर्षांपासून पश्चिम नेपाळमध्ये मोठा भूकंप झालेला नाही. त्यामुळे भरपूर ऊर्जा जमा झाली आहे आणि ती ऊर्जा सोडण्यासाठी भूकंप हे एकमेव माध्यम आहे. पश्चिम नेपाळमधील गोरखा (जिल्हा) ते भारतातील डेहराडूनपर्यंत टेक्टोनिक हालचालींमुळे बरीच ऊर्जा जमा झाली आहे. ती बाहेर पडण्यासाठी या भागात छोटे किंवा मोठे भूकंप होत आहेत.

भूगर्भातील ही परिस्थिती चिंताजनक असताना नेपाळ आजही मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यास सक्षम नाहीये. 2015 चा भूकंप आणि 2021 मधील पूर यासारख्या घटनांतून नेपाळ काहीच शिकला नाही. इंडो ऑस्ट्रेलिया टेक्टोनेट प्लेट यात ऑस्टे्रलिया उपखंड, भारतीय उपखंड आणि लगतच्या महासगाराचा समावेश आहे. हा भाग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. ही प्लेट युरेशियाकडे सरकत आहे आणि ते तिबेटला वरच्या दिशेने ढकलत आहेत. हिमालय तर दरवर्षी सरासरी दोन सेंटीमीटरने वाढत आहे. 'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'च्या एका अहवालात म्हटले आहे की, ल्हासापासून 50 किलोमीटर अंतरावर उत्तरेत शास्त्रज्ञांना चुंबकीय खनिज (मॅग्नाईट) कणांनी युक्त गुलाबी वाळूने तयार झालेल्या दगडांचे थर आढळून आले. या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या फ्लिप फ्लॉपिंग चुंबकीय क्षेत्राच्या पॅटर्नची देखील यावेळी नोंद केली. या अभ्यासातून एक बाब कळते की, जीवाश्म, जीवजंतू सुमारे 10.5 कोटी वर्षांपूर्वी अपेक्षेपेक्षा हलक्या, ओल्या वातावरणात राहात असावेत. त्यावेळी तिबेट हे भूमध्य रेषेजवळ होते. आज तिबेटमधील हवामान अधिक कोरडे असून ते सुमारे दोन हजार किलोमीटर उत्तरेकडे होणार्‍या बदलांना चिन्हांकित करणारे आहे. वाळूच्या दगडातील थरात आढळून आलेले जीवाश्माचे अवशेष हे गेल्या दहा कोटी वर्षात प्लेट सरकणे आणि तिबेट भागातील हवामान बदलाचे पुरावे सांगतात. छिंगहाई-तिबेट पठारच्या परिक्षेत्रात हिमालय पर्वतरांगा ते लडाखचा भाग येतो.

तथापि, तिबेटवर दावा करणार्‍या चीनच्या शासकांना वाटते की, अशा अभ्यासांना काही अर्थ नाही. 'वन बेल्ट वन रोड' या महत्त्वाकांक्षेत अडकलेल्या चीनने ज्यारीतीने तिबेटचे शहरीकरण केले, ते पाहता हा भाग त्यांनी संकटाच्या तोंडाजवळ आणून ठेवला आहे, असेच म्हणावे लागेल. तिबेटमध्ये बदल वेगाने झाला आणि म्हणूनच नैसर्गिक संकटाच्या क्षेत्रात हिमालय पर्वतरांगा देखील आल्या. तिबेटमधील दुर्गम भागातील गाव आता महानगराला जोडला गेला आहे. इंडो ऑस्ट्रेलियन टॅक्टॉनिक प्लेटवर उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारती, रॅपिड रेल्वे, कारखाने, रस्ते बांधणी या चीनच्या विकासाची यशोगाथा सांगत असल्या तरी त्या संकटाला निमंत्रण देणार्‍या आहेत. एकप्रकारे विकासाचा तो भयावह चेहरा आहे. या आघाडीवर चीनला विरोध करण्याची शक्ती नेपाळमध्ये नसेलही परंतु भारताने धाडस दाखवले पाहजे. या गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गांभीर्याने मांडायला हव्यात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news