Pune : रांजणीत बिबट्यांकडून 3 शेळ्यांचा फडशा | पुढारी

Pune : रांजणीत बिबट्यांकडून 3 शेळ्यांचा फडशा

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  रांजणी (ता. आंबेगाव) गावात बिबट्यांनी अक्षरश: धुमाकूळ सुरू केला आहे. सोमवारी (दि. 6) सायंकाळी 5 वाजता कारफाट्यानजीक घरालगत बांधलेल्या शेळीला फरफटत नेऊन बिबट्याने ठार मारले. कारमळा येथील मीरावस्तीत घडलेल्या दुसर्‍या घटनेत मेंढपाळाच्या वाड्यात घुसून दोन गाभण शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. या घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कारफाटानजीक न्हाईचा मळा आहे. तेथे बिट्टू धोंडीबा वाघ यांचे घर आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी समृद्धी वाघ ही घराच्या दक्षिणेला कडवळ कापत होती.

जवळच घराच्या भिंतीलगत शेळी बांधलेली होती. त्या वेळी कडवळाच्या शेतातून काहीतरी हालचाल होऊन आवाज आला. तिने गवत कापण्याचे काम सोडून घरात पळ काढला व आई जया वाघ यांना माहिती दिली. त्या दोघी शेताकडे जायला निघणार, त्याचवेळी बिबट्या शेळीला ओढून नेत असताना त्यांना दिसले. दोघींनी मोठ्याने आरडाओरड केला. मात्र, बिबट्याने शेळीला उसात नेऊन तिचा फडशा पाडला. दुसरी घटना कारमळा येथील मीरावस्तीत घडली. येथील सोपान देवजी वाघ यांचा शेतात म्हस्कू नाथा घुले (मूळ रा. ढवळपुरी, जि. नगर) या मेंढपाळाचा शेळ्या-मेंढ्यांचा वाडा गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामी आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने वाड्यात घुसून दोन गाभण शेळ्यांना जागीच ठार मारले. सध्या रांजणी परिसरात ऊसतोड सुरू झाली आहे. त्यामुळे ऊसशेतात राहणारे बिबटे सैरभैर होऊ लागले आहेत. वन विभागाने कारफाटा, कारमळा परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

 

Back to top button