Pune Crime News : कोयताधार्‍यांची दहशत; 29 वाहने फोडली | पुढारी

Pune Crime News : कोयताधार्‍यांची दहशत; 29 वाहने फोडली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगावातील खेसे पार्क, कलवडवस्ती, पानसरेवस्ती परिसरात कोयताधारी टोळक्याने सोमवारी (दि. 6) पहाटे पावणेतीनच्या सुमारास धुडगूस घालत तब्बल 29 वाहनांची तोडफोड केली. यात रिक्षा, कार, टेम्पो या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मद्य प्राशन करून दहशत निर्माण करण्यासाठी तिघांनी ही तोडफोड केली असून, दहशतीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तोडफोड करणार्‍या तिघांना पकडले असून, त्यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

हासिम खलील शेख (वय 18, रा. कलवडवस्ती) याला अटक केली आहे. याबाबत इनायतअली शौकतअली अन्सारी (वय 27, रा. कलवडवस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. रात्री अकरा वाजता ते आपला स्टॉल बंद करून सव्वा वाजता घरी आले होते. मोबाईल पाहत असताना त्यांना पहाटे दोन वाजता घराबाहेर काहीतरी तोडफोड होत असल्याचा आवाज आला.

त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तिघे रस्त्याच्या कडेला पार्क केल्या वाहनांची लोखंडी हत्याराने तोडफोड करताना दिसून आले. इतर नागरिकदेखील या वेळी घरातून बाहेर आले असता आरोपींनी कोयते, सत्तूर हवेत फिरवून ’हमारे बीच कोई आया तो उसको छोडूंगा नहीं, हिम्मत है तो सामने आओ’ असे म्हणून दहशत निर्माण केली.

शस्त्रधारी टोळक्याच्या दहशतीला घाबरून नागरिक घरात पळाले. त्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतले. या वेळी फिर्यादींना ही तोडफोड हासिम आणि त्याचे साथीदार करीत असल्याचे दिसले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले होते. तोडफोडीत अन्सारी यांच्या टेम्पोचे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर अन्सारी हे तक्रार देण्यासाठी विमानतळ पोलिस ठाण्यात निघाले होते. त्या वेळी अन्सारी यांना नागरिकांनी सांगितले की, कलवडवस्तीप्रमाणेच पानसरेवस्ती आणि खेसे पार्क येथे देखील तिघांनी वाहने फोडली आहेत.

हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी विजय चंदन यांनी काही तासांत तिघा आरोपींना पकडले. आरोपींनी तोडफोड करण्यासाठी वापरलेली शस्त्रे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

तोडफोडीचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, तर एकाला अटक करण्यात आली आहे.

आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे

हेही वाचा

Back to top button