Pune News : समिती ठरवेल तेच अंतिम शुल्क | पुढारी

Pune News : समिती ठरवेल तेच अंतिम शुल्क

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून स्टेशनरी, ओळखपत्र, ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना आदींसाठी वेगळे शुल्क घेता येणार नाही. त्याचप्रमाणे शुल्क उशिराने भरले, म्हणून दंडही आकारता येणार नाही. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना केवळ शुल्क नियामक समितीने (एफआरए) ठरवून दिलेले शुल्कच भरावे लागेल. विद्यार्थ्यांकडून वारंवार अतिरिक्त शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांकडून एकूण जमा शुल्काच्या दुप्पट दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा एफआरएने दिला आहे.

’एफआरए’कडून साधारण 2200 व्यावसायिक महाविद्यालयांचे शुल्क ठरविण्यात येते. ’एफआरए’ने पुढील 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, फार्मसी, विधी, आर्किटेक्चर, एमबीबीएस, एमएस, अ‍ॅग्रिकल्चर कोर्सेस अशा व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविण्यासाठी अंतिम नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या शैक्षणिक संस्थांच्या मुजोरीला लगाम लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.

राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क (ट्युशन फी) आणि विकसन शुल्क (डेव्हलपमेंट फी) घेणे अपेक्षित आहे. मात्र, महाविद्यालयांकडून स्टेशनरी, ओळखपत्र, ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना, क्लब आदींसाठी स्वतंत्र शुल्क घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक व कमीत कमी 15 ते 20 हजार रुपयांचा भुर्दंड पडतो. त्यानंतर प्रवेश, नोंदणीसाठी किंवा इतर कोणत्याही सुविधेसाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात येते.

विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्काची रक्कम थोड्या उशिराने भरल्यास, त्यावर अतिरिक्त शुल्क लावण्यात येते किंवा दंडाद्वारे जास्त शुल्क घेण्यात येते. पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अशा पद्धतीने अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या महाविद्यालयांकडील ही संपूर्ण रक्कम अतिरिक्त उत्पन्न म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे ही रक्कम महाविद्यालयाच्या एकूण खर्चातून वजा करण्यात येईल. या पद्धतीने महाविद्यालयाचे वार्षिक शिक्षण
शुल्कही कमी होईल, असे नियमात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button