नागपूर : चहा-बिस्कीट वेळेत आले नाही म्‍हणून डॉक्टर ऑपरेशन थांबवून निघून गेले | पुढारी

नागपूर : चहा-बिस्कीट वेळेत आले नाही म्‍हणून डॉक्टर ऑपरेशन थांबवून निघून गेले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : तलफ आली की माणूस बेचैन होतो; मग ती चहाची असो की तंबाखू आणि इतर कुठलीही असू देत! आता चहा-बिस्कीट वेळेत न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरने कमालच केली. महिला रुग्णावर शस्त्रक्रिया सोडून तो आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा म्हणून या प्रकारावर संताप व्यक्त होत आहे.

हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडला. डॉ. तेजराम भलावे असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील केंद्रात ते आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते. चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. अन्य चार महिलांना भूलसुद्धा देण्यात आली; पण वेळेत चहा बिस्कीट मिळालं नाही म्हणून डॉक्टरांना राग अनावर झाला आणि ते आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले. डॉक्टरांच्या या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला.

शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. अखेर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली. आता हे प्रकरण समोर आल्‍यावर डॉक्टरने वेगळीच भूमिका घेतली आहे. आपल्याला मधुमेह असून, वेळेवर चहा-बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने रक्तशर्करा व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण डॉ. भलावी यांनी आपल्या वरिष्ठांना दिल्याचे कळते. या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button