Pimpri News : ‘वायसीएम’च्या वसतिगृहात अग्निरोधक उपकरणे अपुरी | पुढारी

Pimpri News : ‘वायसीएम’च्या वसतिगृहात अग्निरोधक उपकरणे अपुरी

दीपेश सुराणा

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेतील विद्यार्थी वसतिगृहातच अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्विशर) बसविले नसल्याचे चित्र शनिवारी (दि. 4) पाहण्यास मिळाले. एखादेवेळेस वसतिगृहात आगीची घटना घडल्यास फायर होज पाईपद्वारे पाण्याची फवारणी करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब झाल्यास किंवा अग्निशामक दलाकडून मदत मिळेपर्यंत या ठिकाणी राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी अग्निरोधक उपकरणे असणे गरजेचे आहे.

रुग्णालयात अन्यत्र 248 फायर एक्स्टिंग्विशर बसविण्यात आलेले आहेत. वसतिगृह इमारतीत जिन्यांच्या जवळ फायर होज पाईप आहेत. त्याशिवाय, फायर अलार्मची सोय केलेली आहे. मात्र, सर्वाधिक महत्त्वाचे फायर एक्स्टिंग्विशर बसविण्याकडे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. पुण्याच्या रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनी वसतिगृहाला दोन दिवसांपूर्वी आग लागली. त्या वेळी खोलीतील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या.

येथे 18 अग्निरोधक (फायर एक्स्टिंग्विशर) उपकरणांचा वापर करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. रुग्णालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात झालेली ही आगीची दुर्घटना लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे, याची दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पाहणी केली.

दक्षता खूप गरजेची

वसतिगृह इमारतीत एखाद्या खोलीमध्ये अचानक आग लागण्याची घटना घडल्यास त्या खोल्यांजवळ लगेचच काही अंतरावर फायर एक्स्टिंग्विशर असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.

अग्निशामक विभागाकडून प्रात्यक्षिके

आगीची दुर्घटना घडल्यास काय करायला हवे, याबाबत महापालिका वैद्यकीय विभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. वायसीएम रुग्णालयातही दर तीन महिन्याला हे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. डॉ. वाबळे म्हणाले की, अग्निशामक दलाकडून शनिवारी (दि. 4) याबाबतची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत.

काय आढळले पाहणीत?

वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत वैद्यकीय शाखेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी रुग्णालय इमारतीच्या सातव्या मजल्यावर वसतिगृह आहे. या वसतिगृहात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र सोय आहे. येथे तीन जिने असून जिन्यांच्या जवळ फायर होज पाईप (पाणी वाहुन नेता येतील, असे पाईप) बसविलेले आहेत. त्याचप्रमाणे, वसतिगृहाच्या परिसरात फायर अलार्मचीदेखील सोय केलेली आहे. या दोन्ही बाबींची पूर्तता करणार्या रुग्णालय प्रशासनाचे फायर एक्स्टिंग्विशर बसविण्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

वायसीएम रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. रुग्णालयात फायर एक्सटिंग्विशर बसविलेले आहेत. वसतिगृहाच्या परिसरात याबाबत तपासणी करुन फायर एक्स्टिंग्विशर बसविण्यात येतील. येथील जिन्यांजवळ बसविलेले फायर होज पाईपची लांबी 32 ते 33 मीटर इतकी आहे. या पाईपद्वारे वसतिगृहाच्या परिसरात आपत्कालीन स्थितीत तातडीने पाणी आणणे शक्य आहे.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता,
वायसीएम रुग्णालय.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे ऑडिट चालू आहे. नवीन इमारतीला अग्निशामकची एनओसी देत असताना अग्निरोधक उपकरणे बसविली आहेत का, ती सुस्थितीत आहेत का, याची तपासणी केली जाते. वायसीएमच्या विद्यार्थी वसतिगृहात फायर एक्स्टिंग्विशरची सोय नसल्यास तशी सोय करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला कळविण्यात येईल.

– अनिल डिंबळे, प्रभारी सब-ऑफिसर, अग्निशामक विभाग, महापालिका.

हेही वाचा 

IND vs SA Match : भारताने द. आफ्रिकेविरूद्ध टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी

जळगाव : कोळी समाजाच्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता

Pune News : सोशल मीडियाच्या जमान्यातही शुभेच्छापत्रांची चलती

Back to top button