Pune News : सोशल मीडियाच्या जमान्यातही शुभेच्छापत्रांची चलती | पुढारी

Pune News : सोशल मीडियाच्या जमान्यातही शुभेच्छापत्रांची चलती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या जमान्यात शुभेच्छापत्रांतून दिल्या जाणार्‍या त्या शुभेच्छांचे शब्द हरवले, असं म्हटलं जात आहे…पण, असे चित्र नाही… आजही तो ओलावा कायम असून, दिवाळीनिमित्त अनेकांनी शुभेच्छापत्रांद्वारे दिवाळीच्या गोड शुभेच्छा देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच म्युझिकल असो वा हॅण्डमेड, शुभेच्छापत्रांना मागणी आहे.

दिवाळी म्हटले की, शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे आणि कुरिअरद्वारे पाठवून नातेवाइकांना, आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची रीत होती…काळाप्रमाणे माध्यम बदलले आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देण्याचा ट्रेंड सुरू झाला; परंतु आताच्या डिजिटल युगातही शुभेच्छापत्रांना प्रतिसाद टिकून असल्याचे व्यावसायिक सांगतात. आता दिवाळीचा सण काही दिवसांवर आल्याने शुभेच्छापत्रांच्या खरेदीला सुरुवात झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

कंपन्यांकडून हिंदी, मराठी, इंग्रजीत संदेश लिहिलेली पत्रे व्यावसायिकांकडे विक्रीसाठी आली आहेत. त्यात हॅपी दिवाली, दीपावलीच्या शुभेच्छा अशा संदेशांसह कवितेच्या ओळींचाही समावेश आहे. तर म्युझिकल, थ—ीडी प्रकारातील, हॅण्डमेड आणि कलरफुल शुभेच्छापत्रांची खरेदी होत आहे. हॅण्डमेड शुभेच्छापत्रांचा सध्या ट्रेंड असून, संस्था-कंपन्यांकडून या प्रतिसाद आहे. भेटवस्तूंच्या विक्रीच्या दालनांमध्ये शुभेच्छापत्रांच्या खरेदीसाठीची लगबग पाहायला मिळत आहे. हॅण्डमेड शुभेच्छापत्रे तयार करणारे काही कलाकारही कामाला लागले आहेत, त्यांच्याकडे अशा शुभेच्छापत्रांसाठी मागणी आहे.

आकाशकंदिलाने, रंगबेरंगी फुलांनी सजविलेली शुभेच्छापत्रे पाहायला मिळतीलच. त्याशिवाय लक्ष्मीपूजनासह दिवाळी पाडवा, भाऊबीजेवर आधारित शुभेच्छापत्रेही उपलब्ध आहेत. शुभेच्छापत्रांची किंमत 20 रुपयांच्या पुढे आहे. दिवे-पणत्यांनी सजलेल्या, मंदिरांची प्रतिकृती असलेल्या, रांगोळींनी सजलेल्या शुभेच्छापत्रांचीही चलती आहे. सामाजिक संस्था आणि कला संस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांकडून शुभेच्छापत्रे तयार करून घेतली जात आहेत आणि त्यांचे विनामूल्य वाटप दिवाळीत करण्यात येणार आहे.

  • व्यावसायिक भरत शाह म्हणाले, ’डिजिटलच्या जमान्यातही शुभेच्छापत्रांना प्रतिसाद आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीत संदेश लिहिलेली शुभेच्छापत्रे खरेदी केली जात असून, संस्था-कंपन्यांकडूनही पत्रे खरेदी केली जात आहेत. त्याशिवाय दिवाळीचा सण जवळ आल्याने लोकही शुभेच्छापत्रांच्या खरेदीसाठी येत आहेत.’
  • मानसी परळीकर म्हणाल्या, ’मी ग्राफिक डिझायनर असून, लोकांच्या मागणीप्रमाणे मी डिजिटल माध्यमाद्वारे शुभेच्छापत्र तयार करून देते. ज्यांना शुभेच्छापत्र तयार करून हवी आहेत, ते आर्वजून शुभेच्छापत्रे तयार करून घेत आहेत.’

हेही वाचा

Pune Grampanchayat News : शेळगावात बनले आदर्श मतदान केंद्र; फुलांची कमान, हिरकणी कक्ष,आकर्षक रांगोळी, गुलाबपुष्पाने स्वागत

रायगड : ब्‍ल्‍यूजेट कंपनी दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार अनिकेत तटकरे

घरात सापडल्या दोन तलवारी, गुप्ती; दोघांविरुध्द गुन्हा

Back to top button