IND vs SA Match : भारताचे द. आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य | पुढारी

IND vs SA Match : भारताचे द. आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा 15 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. (IND vs SA Match)

भारतीय संघाची दणदणीत सुरूवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी संघाला दणदणीत सुरूवात करून दिली. त्यांनी अवघ्या पाच षटकात 61 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने 22 चेंडूत 40 धावा केल्या. यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्न करताना कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याला  द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने टेंबा बवुमा करवी झेलबाद केले.

रोहित बाद झाल्यानंंतर शुभमन गिल मैदानावर फार काळ टिकू शकला नाही.  तो 11 व्या षटकात बाद झाला. त्याला द. आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले.

यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने संघाचा डाव सांभाळला. या दरम्यान विराटने संयमी खेळी केली. यावेळी त्याने 67 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरने 65 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

सामन्याच्या 37 व्या षटकात श्रेयस अय्यरच्या रूपात भारताचा तिसरा फलंदाज बाद झाला. त्याला एन्गिडीने मार्करम करवी झेलबाद केले. श्रेयसने आपल्या खेळीत 87 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. श्रेयसला बाद करत एन्गिडीने विराट-श्रेयस जोडीची तिसऱ्या विकेटसाठीची 134 धावांची भागिदारी फोडली.

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला केएल राहूल 8 धावाकरून स्वस्तात बाद झाला. त्याला मार्को जॅनसेनने  डुसेनकरवी झेलबाद केले.  यानंतर सुर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत धावा कुटल्या. परंतु स्वीप शॉट मारताना त्याचा शानदार झेल विकेटकीपर क्विंटन डी कॉकने झेलला. त्याला शम्सीने बाद केले.

विराट कोहलीचे शानदार शतक

विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक ठरले. या बाबतीत त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.

रवींद्र जडेजाची फटकेबाजी

सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने विराटला साथ देत अंतिम षटकात फटकेबाजी केली. या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने 300 धावांचा टप्पा पार केला. त्याने आपल्या खेळीत 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्या आणि विराटच्या खेळीमुळे द. आफ्रिकेला विजयसाठी 327 धावांचे लक्ष्य दिले आहे.  (IND vs SA Match)

गोलंदाजीमध्ये द. आफ्रिकेकडून शम्सी, महाराज, रबाडा, एन्गिडी आणि जानसेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वनडेत सर्वाधिक शतके

  • ४९ विराट कोहली (२७७ डाव)
  • ४९ सचिन तेंडुलकर (४५२ डाव)
  • ३१ रोहित शर्मा (२५१ डाव)
  • ३० रिकी पाँटिंग (३६५ डाव)
  • २८ सनथ जयसूर्या (४३३ डाव)

Back to top button