Pune News : वाघोलीतील ड्रेनेजची समस्या सुटेना | पुढारी

Pune News : वाघोलीतील ड्रेनेजची समस्या सुटेना

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी केसनंद रस्त्यावर वाहत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी महापालिका संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, समस्या ऐकण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत अधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून ठिय्या आंदोलन केले.

परिसरात उघड्यावरून वाहणार्‍या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने जेजे नगर परिसरातील संतप्त नागरिकांनी मनसेचे अ‍ॅड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली महापालिका संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.

मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याने अधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत ही समस्या न सोडविल्यास तीव— आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. ड्रेनेज लाईनचे पाणी केसनंद फाटा येथील मैदानात उघड्यावर सोडले आहे. केसनंद रस्त्यावरील खड्ड्यांत हे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने परिससरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघातही होत आहेत. महापालिकेचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबादारी झटकत असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले.
याबाबत महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता रूपाली वाळके यांनी विचारले असता, हा विषय आमच्या कार्यालयांतर्गत येत नसून, तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. याबाबत त्यांना पत्राद्वारे कळविले आले असल्याचे वाळके यांनी सांगितले.

हेही वाचा

रायगड : ब्‍ल्‍यूजेट कंपनी दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार अनिकेत तटकरे

घरात सापडल्या दोन तलवारी, गुप्ती; दोघांविरुध्द गुन्हा

 

 

 

Back to top button