रायगड : ब्‍ल्‍यूजेट कंपनी दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार अनिकेत तटकरे | पुढारी

रायगड : ब्‍ल्‍यूजेट कंपनी दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार अनिकेत तटकरे

महाड; पुढारी वृत्‍तसेवा शुक्रवार तीन नोव्हेंबर रोजी महाड औद्योगिक वसाहतीच्या ब्ल्यूजेट केमिकल कंपनीमध्ये आगीची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटणेस जबाबदार असलेल्या कंपनी व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी केली. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना भरघोस आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

शुक्रवारच्या दुर्घटनेनंतर शनिवारी दुपारी आमदार अनिकेत तटकरे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत कंपनीला भेट देऊन तेथे उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व शासनाकडून या अपघातास जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

केवळ महाड नव्हे तर रायगडच्या इतिहासात अशी भीषण दुर्घटना भविष्यात होऊ नये हे लक्षात घेऊन शासनाने या संदर्भात अत्यंत कठोरपणे संबंधितांच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या संदर्भात आपल्या संवेदना व्यक्त करताना त्यांनी कंपनी व्यवस्थापनाने व शासनाने त्यांच्या जवळच्या नातेवाईकांस योग्य मोबदला द्यावा. दुर्दैवाने ती व्यक्ती परत येणे शक्य नाही, मात्र नातेवाईकांच्या भविष्यकालीन गोष्टी लक्षात घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button