जागतिक हास्य दिन विशेष : ‘हसा आणि एक झाड लावा’ यंदाची संकल्पना | पुढारी

जागतिक हास्य दिन विशेष : ‘हसा आणि एक झाड लावा’ यंदाची संकल्पना

नाशिक : नील कुलकर्णी

वाढत्या ताणतणावाच्या युगात प्रत्येकालाच, सुखी, निरामय आणि आनंदी जीवन हवे आहे. यासाठी नियमित योग, व्यायाम याला हास्याची जोड देत हजारो नाशिककर शहरात सुरू असलेल्या शंभराहून अधिक हास्यक्लबमधून तणावविरहित आनंदी जीवनाचे गुपित शोधत आहेत. हास्य क्लब केवळ नागरिकांना आनंदी ठेवण्याचे तंत्र शिकवत नाही तर सामाजिक उपक्रमातून सेवा कार्यही करत आहे.

मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा होतो. ‘हसा आणि एक झाड लावा’ अशी यंदाची संकल्पना आहे. नाशिकमध्ये १९९६ मध्ये नंदीनी हास्यक्लबच्या माध्यमातून हास्यक्लब पर्वाला प्रारंभ झाला. हसण्याला योगाशी पुरक ठरवून त्याची हास्य याेग अशी सांगड घालण्यात आली. त्यावेळी हसण्यातून निरोगी आनंदी जीवन व शरीर रोगमुक्त करता येते, याची कल्पना फारच कमी लोकांना होती. शहरात हास्य क्लब सुरू झाले तसतसे हास्ययोग संकल्पनाही रुजत गेली. आज शहरात १०० हून अधिक हास्य क्लबमधून हजारो नागरिक निरामय, आनंदी जीवनाची बाग फुलवत आहेत. नवीन नाशिक येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील गाडगे महाराज हास्य क्लब येथे २०० हून अधिक नागरिक हास्य योगाचा फायदा घेत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील सर्वच हास्य क्लब मोफत आहेत.

भारतातील पहिल्या हास्य योग मार्गदर्शिका डॉ. सुषमा दुग्गड यांनी शहरात हास्यक्लब संकल्पना रुजवून हास्ययोगाला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या हास्य क्लब सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या अँकर पर्सन म्हणून हजारो कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग घेतात.

गेली अनेक वर्ष मी हास्य क्लब चालवत आहे. त्यामुळे माझे आयुष्य निरायम, आनंदी झाले CHANDA pudhari.newsआणि इतराच्या जीवनात आनंद फुलवल्याचे समाधान आहे. महिलांनी आपल्या व्यग्र घरकामातून दिवसातून एकदा मनमोकळे हसायलाच हवे. हास्य क्लबमध्ये जाऊन जीवन सुखी करावे.
-चंदा सोनवणे, हास्य क्लब सदस्य, मखमलाबाद रोड

शहरात आज हास्य दिंडी
जागतिक हास्य दिनाच्या औचित्यावर शहरात आज दोन ठिकाणी हास्य दिंडी काढण्यात येणार आहे. गंगापूर रोड येथे रावसाहेब थोरात सभागृहाजवळ, नवीन नाशिक पवननगर, सिडको येथे हास्य दिंडी काढण्यात येणार आहे. नाशिकरोड भागातील हास्यक्लबतर्फे वृद्धाश्रमाला भेटी देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शहरात हास्यक्लबमधून योग, प्राणायाम यासह योगासनाला पुरक म्हणून हास्य प्रकार DR DUGGAD pudhari.newsकरवून घेतले जातात. प्रत्येकाला निरायम, आनंदी जीवन हवे आहे. यासाठी शहरातील सर्वच हास्यक्लबमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. हास्य समितीतर्फे हास्य योगातून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुरुष आणि महिलांना हास्य श्रीमान आणि हास्य श्रीमती सन्मानाने गौरवण्यात येते. यासह योग हास्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या क्लबचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जातो.
– डॉ. सुषमा दुग्गड,
हास्य योग तज्ज्ञ .

हास्य दिनाची संकल्पना भारतातूनच..
जागतिक हास्य दिनाची स्थापना १९९८ केली गेली. पहिला उत्सव १० मे १९९८ रोजी भारताच मुंबई येथे साजरा झाला. जगभरातील हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनीच हास्य दिनाची संकल्पना मांडत सर्वप्रथम हास्य उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. जागतिक हास्य दिन साजरा करणे हा जागतिक शांततेसाठी एक सकारात्मक प्रकटीकरण आहे आणि हास्याद्वारे बंधुता आणि मैत्रीची जागतिक जाणीव निर्माण करण्याचा हेतू असल्याचे सांगितले गेले. हास्य दिन हसण्याच्या एकमेव उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या मेळाव्याद्वारे साजरा केला जातो. हास्य क्लब आणि या दिनाची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. हास्य योग चळवळीसह आता १२० हून अधिक देशांमध्ये हजारो हास्य क्लबची गणना केली जात आहे. हास्य योगातून निरोगी आयुष्याकडे ही चळवळ आता व्यापक झाली आहे.

हसण्याचे फायदे
*मनोकायिक आजारांवर प्रभावी, निराशा, एकटेपणा घालवते
*दमा, मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांना फायदा
*पोटाचे आजार, बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत

Back to top button