Pimpri News : पिंपरी रेल्वे स्थानक असुविधेच्या विळख्यात | पुढारी

Pimpri News : पिंपरी रेल्वे स्थानक असुविधेच्या विळख्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी रेल्वे स्थानकातील अस्वच्छता, अनधिकृत विक्रेत्यांचा प्रवेश, बंद एस्केलेटर तसेच स्थानकासमोर अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. अशा विविध समस्यांच्या विळख्यात पिंपरी रेल्वे स्थानक सापडले आहे. या रेल्वे स्थानकामधून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. पिंपरी रेल्वे स्थानकात लोणावळ्याकडे जाणार्‍या 19 आणि पुण्याकडे जाणार्‍या 19 लोकलसाठी थांबा आहे. तसेच सिंहगड एक्स्प्रेसचा थांबा आहे. पिंपरी रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांना मुंबई, पुणे आणि लोणावळ्याला जाण्यासाठी सोयीस्कर आहे.

तसेच पिंपरी शहरात शाळा, कॉलेज आणि विविध शासकीय कार्यालये असल्यामुळे विद्यार्थी, नागरिक शहरात येत असतात. पण, स्थानकाबाहेर विक्रेत्यांनी अनधिकृत दुकाने लावली आहेत. तसेच स्थानकाबाहेर कशा पद्धतीने रिक्षा पार्किंग करत असल्यामुळे नागरिकांना स्थानकात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकते जिने बसविण्यात आले आहे; मात्र सध्या ते बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका प्लॅटफॉर्महून दुसरीकडे जाताना मोठी गैरसोय होत आहे. या समस्येवर रेल्वे विभागाने उपाय काढावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मद्यपी, भिकार्‍यांचा सर्रास वावर

रेल्वे स्थानकात प्रवाशांव्यतिरिक्त दारुडे, भिकारी बिनदिक्कत प्रवेश करतात. या मद्यपींमुळे स्थानकात येणार्‍या महिला, विद्यार्थींनी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

अनधिकृत विक्रेत्यांचा प्रवेश

रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक अनधिकृत विक्रेते आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना नागरिकांची दमछाक होते. या अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कोणाच्या आशीर्वादाने अनधिकृत दुकाने सुरू आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

प्रवाशांच्या शोधात रिक्षाचालक स्थानकात

एरवी रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवेश केल्यावर प्रवाशांना दंड भरावा लागतो. पण, रेल्वे स्थानकाबाहेर गेट समोरच रिक्षा उभी करून चालक प्रवाशांच्या शोधात रेल्वे स्थानकात प्रवेश करतात. यांच्यावर मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

हेही वाचा

सांगली : तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जतचा दुष्काळी यादीत समावेश नसल्याने नाराजी

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी मुक्ताईनगरात महामृत्युंजय यज्ञ

एमएनएफ-झेडपीएम-भाजपला एकाच तराजूत तोलतेय काँग्रेस

Back to top button