एमएनएफ-झेडपीएम-भाजपला एकाच तराजूत तोलतेय काँग्रेस

एमएनएफ-झेडपीएम-भाजपला एकाच तराजूत तोलतेय काँग्रेस
Published on
Updated on

मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता आठवडाभरापेक्षाही कमी कालावधी उरला असून, प्रचारात रागरंग पाहिला तर गतवेळपेक्षा यावेळी काँग्रेस जास्त आक्रमक मुद्रेत दिसत आहे. मणिपूरच्या वांशिक संघर्षाचा आधार घेत काँग्रेसने सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि भाजपला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर काँग्रेसला निवडणुकीत भरीव कामगिरी साध्य करता येईल, असे राजकीय पंडितांमध्येदेखील मानले जात आहे.

मणिपूरमधील हिंदू मैतेई आणि कुकी-झुमी लोकांदरम्यान झालेल्या वांशिक संघर्षानंतर हजारो कुकी-झुमी लोकांनी सुरक्षेसाठी मिझोराममध्ये आश्रय घेतला होता. कुकी-झुमी हे ख्रिश्चन आहेत, तर मिझोराम हेही ख्रिश्चनबहुल राज्य असल्याने या राज्यातील लोकांत भाजपविरोधात संताप आहे. केंद्रात मिझो नॅशनल फ्रंटची भाजपसोबत आघाडी असल्याने मणिपूरच्या स्थितीसाठी व शरणार्थींच्या संकटासाठी एमएनएफसुद्धा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे. दुसरीकडे, झोराम पीपल्स मूव्हमेंट हा पक्षही भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करीत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. थोडक्यात, एकाचवेळी तिन्ही पक्षांना शिंगावर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

सलग दोन टर्म सत्तेत राहिल्यानंतर 2018 साली काँग्रेसला मिझोराममधली सत्ता गमवावी लागली होती. त्या वेळच्या निकालानंतर काँग्रेसने ईशान्य भारतातला शेवटचा किल्ला गमावला, असे म्हटले गेले होते. मात्र आता हाच किल्ला हस्तगत करण्यासाठी काँग्रेस धडपडत आहे. मणिपूर प्रकरणावरून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामचा प्रचारदौरा टाळला होता. या सर्व स्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

मागील निवडणुकीचा विचार केला, तर काँग्रेसला 40 पैकी केवळ 5 जागा जिंकता आल्या होत्या. दुसरीकडे, मिझो नॅशनल फ्रंटने 26 जागांसह बहुमत प्राप्त केले होते, तर झेडपीएमला 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपच्या आक्रमक हिंदुत्ववादापासून आम्हीच राज्याला वाचवू शकतो, असा प्रचार काँग्रेसकडून सुरू आहे. तर, मुख्यमंत्री झोरांगथामा यांच्या एमएनएफने मिझो राष्ट्रवादावर भर दिला आहे. दीर्घकाळानंतर काँग्रेसने नव्या नेत्यावर विश्वास टाकला आहे. हे नेते म्हणजेच मिझोराम काँग्रेसचे अध्यक्ष लालसावता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

झेडपीएमसुद्धा भाजपची साथीदार असल्याने त्यांच्यावर विश्वास टाकू नका, असे आवाहन लालसावता प्रचार सभांत करीत आहेत.
कधीकाळी राज्यात काँग्रेसचा मोठा दबदबा होता. 2013 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 34 जागा जिंकल्या होत्या. मात्र याच्या पाच वर्षांतच पक्षाची दैन्यावस्था झाली. 45 टक्क्यांच्या असलेली पक्षाची मतदानाची टक्केवारी 30 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. लालथानवाला यांच्याकडून पक्षाची सूत्रे नव्या नेतृत्वाकडे गेल्याने काहीतरी चमत्कार घडेल, असा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला विश्वास आहे.

1973 पासून राजकारणात कार्यरत असलेले 2021 साली लालथानवाला हे निवृत्त झाले होते. सुमारे पाच दशकांच्या काळात दोनदा त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीद्वारे लालसावता काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिझोराममध्ये काँग्रेसने कमबॅक केले तर ईशान्य भारतातल्या अन्य राज्यांमध्येही काँग्रेसच्या आशा पल्लवित होतील, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news