सांगली : तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जतचा दुष्काळी यादीत समावेश नसल्याने नाराजी | पुढारी

सांगली : तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जतचा दुष्काळी यादीत समावेश नसल्याने नाराजी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सरकारने राज्यातील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्यातील शिराळा, मिरज, कडेगाव व खानापूर तालुक्यांचा समावेश आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यां बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान दुष्काळी तालुक्यात तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांचा समावेश नसल्याने या भागातील लोकांत नाराजी आहे.

जिल्ह्यात यंदा उशिरा आणि कमी प्रमाणात पाऊस पडला. दोन पावसामधील खंडही 21 दिवसापेक्षा जास्त राहिला. त्यामुळे जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. प्रशासनाने ‘महामदत अ‍ॅप’ व ‘ट्रिगर टू’ याच्या आधारे मिरज, शिराळा, कडेगाव व खानापूर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचा अहवाल पाठवला होता. त्यानंतर सरकारने राज्यातील 42 तालुक्यात दुष्काळाची स्थिती असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कायमस्वरूपी दुष्काळ भाग असलेले जत, कवठेमंकाळ, आटपाडी, तासगाव या तालुक्यातील लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर या चार तालुक्यात प्रशासनाने समिती पाठवून प्रत्येक तालुक्यातील दहा गावात पाहणी करून टँकरची स्थिती, पिकाचे उत्पादन, पावसाचा खंड याच्या आधारे या इतर चार तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यात समावेश करावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठवलेला आहे. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button