Pimpri News : शहरात वाढली श्वानांची दहशत | पुढारी

Pimpri News : शहरात वाढली श्वानांची दहशत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये सप्टेंबर महिन्यात 1 हजार 933 नागरिकांनी तर, ऑगस्ट महिन्यात 1 हजार 836 नागरिकांनी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेतले होते. म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 97 अधिक नागरिकांनी लसीकरण करुन घेतले. एकंदरितच, श्वानांकडून चावे घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. शहरात नागरिकांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण होत आहे. असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरात गेल्या सहा महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत एकूण 11 हजार 217 नागरिकांनी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे. म्हणजे डॉग बाईटच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
गतवर्षी म्हणजे 2022-23 मध्ये तब्बल 18 हजार 500 नागरिकांनी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेतले होते.

श्वानांचा मुक्त संचार

शहरातील विविध भागांमध्ये भटक्या श्वानांचा मुक्त संचार पाहण्यास मिळतो. दुचाकीवरुन जाणारे वाहनचालक, पादचारी यांना ते लक्ष्य करतात. त्याशिवाय, चारचाकी वाहनांमागेही हे श्वान धावत असतात. रात्री कामावरुन घरी परतणारे कामगार, पहाटे फिरण्यासाठी जाणारे नागरिक यांच्या अंगावर हे श्वान धावुन जातात.
भटक्या श्वानांना पकडून त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यात येते. हे काम सीएसआर फंडातून खासगी संस्थेमार्फत केले जात आहे. गेल्या सात महिन्यांत दीड हजाराचे श्वानांचे निर्बिजीकरण आणि अडीच हजार श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले आहे.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.
शहरामध्ये श्वानांची संख्या आणि त्यांच्याकडून चावे घेण्याचे प्रकार वाढले आहेत. तथापि, त्यांच्यामार्फत पसरणार्‍या रेबीज या आजाराचा एकही रुग्ण नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची सोय आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
हेही वाचा

Back to top button