सातारा : शिकारीची हौस अन् फायरिंगचा पाऊस | पुढारी

सातारा : शिकारीची हौस अन् फायरिंगचा पाऊस

सातारा, पुढारी वृत्तसेवा : वाईत सराईत गुन्हेगाराकडे बंदुका, काडतुसे, तलवारी असा ऐवज सापडल्याने पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. वाईतील बंद फ्लॅटमध्ये 5 बंदुका, 78 जिवंत काडतुसे, वापरलेल्या काडतुसाच्या 370 रिकाम्या पुंगळ्या, 2 तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख सापडले. अविनाश पिसाळ (रा. बावधन, ता. वाई) या सराईताकडे हा ऐवज सापडला असून त्याला शिकारीची हौस असून यापोटीच वाईतील रानांमध्ये फायरिंगचा पाऊस पाडल्याचे त्याने कबूल केले. दरम्यान, संशयिताने बंदुका कोठून आणल्या? याचा पोलिस तपास करत आहेत.

संशयित अविनाश पिसाळ याला 10 वर्षांपासून शिकारीचा नाद लागला होता. शिकारीसाठी वाईसह तालुक्यातील अनेक राने त्याने तुडवली आहेत. शिकारीसाठी त्याने बंदूक मिळवली. त्यातूनच त्याला विविध प्रकारच्या बंदुकींचाही शौक जडला. आतापर्यंत त्याने पाच बंदुका जमवल्या. बाजारात बंदुकीसाठी गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने त्या खरेदी करण्याचाही सपाटा त्याने लावला. दरम्यान, वाईसह परिसरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. पोलिसांनी टोळ्या जेलमध्ये घातल्याने शांतता आहे. मात्र असे काही आणखी उद्योग सुरू असतील तर नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना गोपनीय माहिती देणे गरजेचे बनले आहे.

शिकारीच्या फुशारक्या अन् फ्लॅटच्या चर्चेतून क्लू

संशयित अविनाश पिसाळ याच्यावर गुन्हे दाखल असल्याने परिसरात लोकं वचकून असायची. अशातच तो अनेक बंदुका, गोळ्या, तलवारी आणि शिकारीच्या फुशारक्या मारायचा. यातूनच बावधन व्हाया वाईतील बावधन नाक्यावरील फ्लॅटच्या चर्चा पोलिसांच्या खबर्‍यांपर्यंत आल्या. पोलिस विशाल पवार यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माहिती घेऊन धाड टाकली.

पुंगळ्या जमवण्याचा शौक आला अंगलट…

पिसाळ याला शिकारीच्या नादासह इतर नादही जडू लागले होते. एक बंदूक आणल्यानंतर आणखी वेगवेगळ्या बंदुका जमवणे याचाही तो नंतर शौकीन झाला. शिकारीसाठी फायरिंग केल्यानंतर आपण किती राउंड फायर केले? याची माहिती असावी म्हणून रिकाम्या पुंगळ्याही तो जपून ठेवत असायचा. आपण मोठा शिकारी आहे, हे दाखवण्यासाठी केलेला शौक त्याच्या चांगलाच अंगलटी आला.

अग्गो बाई..कशी गं ही वाई

संशयित अविनाश पिसाळ याने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर बंदुकीसह गोळ्यांचा व इतर हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, तो आणला कुठून? या पाठीमागे आणखी कोणाचा सहभााग आहे का? किती रुपयांना बंदुका, गोळ्या आणल्या? नेमक्या किती प्राण्यांची शिकार झाली आहे? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वाई हत्याकांड, वाई न्यायालयातील फायरिंग यानंतर आता शस्त्रांचा मोठा साठा जप्त झाल्याने ‘अग्गो बाई कशी ही वाई’ अशी चर्चा रंगू लागली आहे.

बंदूकप्रकरणी 84 जणांना अटक

सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 रोजी बंदूकीच्या कारवाई करत 84 जणांना गजाआड केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 29 गुन्हे दाखल झाले असून 58 बंदुका जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, जप्त 160 जिवंत काडतुसे व 370 रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

Back to top button