पालिकेने दिलेली नोटिस बेकायदा ; पुनीत बालन यांचे नोटीशीला उत्तर | पुढारी

पालिकेने दिलेली नोटिस बेकायदा ; पुनीत बालन यांचे नोटीशीला उत्तर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दहिहंडी उत्सवादरम्यान लावलेल्या जाहिरातींबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने बजावलेली दंडाची नोटीस ही बेकायदा आहे. वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीसाठी ही नोटीस बजाविण्यात आली. ही नोटीस रद्द करून त्यासंबंधीचे स्पष्टीकरण महापालिकेने द्यावे, असे उत्तर उद्योजक पुनीत बालन यांनी महापालिकेच्या दंडाच्या नोटिसीला दिले आहे.
दहिहंडी उत्सवादरम्यान मंडळांनी लावलेल्या पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सीरीच कंपनीच्या जाहिरातीपोटी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्तांनी उद्योजक बालन यांना तीन कोटींच्या दंडाची नोटीस बजावली आहे.

संबंधित बातम्या :

त्यावर आता बालन यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने 4 जानेवारी 2023 रोजी शासनाला पाठविलेल्या पत्रात शहरातील गणेशोत्सव कालावधीत उत्सव मंडप, स्टेजकरिता पूर्वीपासून कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच 2019 पूर्वीपासून पोलिस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत व रनिंग मंडप परवाना शुल्कदेखील महापालिकेच्या 9 सप्टेंबर 2019 च्या सर्वसाधारण सभेने रद्द करण्याची मान्यता दिल्याचे व तेव्हापासून आकारणी केली जात नसल्याचे नमूद केले आहे.

तसेच 2019 गणेशोत्सव कालावधीत, मोहरम, दहिहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेली नि:शुल्क परवानगी ही पुढील पाच वर्षांकरिता म्हणजे 2022 ते 2027 पर्यंत करण्याचा निर्णय गणेश मंडळे, पोलिस अधिकारी व महापालिका अधिकार्‍यांच्या ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने गणेश मंडळांना नोटिसा देणे अपेक्षित असताना मला देऊन ती माध्यमांना पाठवून माझी बदनामी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मला पाठविलेली नोटीस रद्द करावी आणि ती रद्द केल्याबाबत प्रसारमाध्यमांनादेखील कळवावे, असे बालन यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

Back to top button