युद्ध थांबविण्यास इस्रायलचा नकार | पुढारी

युद्ध थांबविण्यास इस्रायलचा नकार

तेल अवीव; वृत्तसंस्था :  ‘हमास’ या दहशतवादी संघटनेविरोधातील युद्ध थांबविण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्र संघाने दिलेला प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे. ‘हमास’विरोधात कारवाई गतिमान करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, ‘हमास’चा आणखी एक म्होरक्या मुबाशेर याला कंठस्नान घातल्याची माहिती इस्रायलने दिली आहे

. हवाई हल्ले तीव्र करण्यासाठी अमेरिका इस्रायलला आयर्न ड्रोन सिस्टीम पाठविणार आहे. याद्वारे ड्रोन आणि रॉकेट हल्ले करण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत इस्रायलने 400 हून अधिक हवाई हल्ले केले असून, यामध्ये 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 6 हजारांहून अधिक लोक ठार झाले आहेत. दहशतवाद्यांचे शव विखुरले आहेत. त्यामुळे मृतदेह सामूहिकरीत्या दफन करण्यात येत आहेत. मृतांची ओळख पटत नसल्यामुळे नातेवाईकांकडे विचारणा केली जात आहे. ‘युनो’च्या मदत व पुनर्वसन छावण्यांमध्ये सहा लाख पॅलेस्टिनी लोकांनी आश्रय घेतला आहे. मानवतावादी भूमिकेतून पॅलेस्टाईनसाठी छावण्या सुरू केल्याची माहिती ‘युनो’ने दिली आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लोक ठार झाले आहेत; तर ‘हमास’च्या हल्ल्यात 1,400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

‘युनो’प्रमुखांनी राजीनामा द्यावा ः इस्रायल

संयुक्त राष्ट्र संघाचे (युनो) प्रमुख अँटोनिओ गुटरेस यांनी ‘हमास’च्या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, ‘हमास’कडून निरर्थक प्रतिहल्ले होत नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इस्रायलने गुटरेस यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुटरेस दहशतवाद्यांचे समर्थन करीत असल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी इस्रायल दूतावासातील अधिकार्‍यांनी केली आहे. गाझापट्टीतील इंधनसाठा संपत आल्याने मदतीवर परिणाम होणार असल्याचेही ‘युनो’ने म्हटले आहे.

एर्दोगन म्हणतात, ‘हमास’ लिबरेशन फ्रंट

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यब एर्दोगन यांनी ‘हमास’ ही दहशतवादी संघटना नसून, लिबरेशन फ्रंट (मुक्ती संघटना) असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यानंतर त्यांनी इस्रायल दौराही रद्द केला आहे. ‘हमास’ आपल्या भूमीसाठी लढा देत आहे. इस्रायलने त्यांच्याविरोधात अमानुषपणे कारवाई केल्यामुळे आपण इस्रायलचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी संसदीय सदस्यांना दिली.

10 ज्यूंची हत्या केल्याचा व्हिडीओ सुरक्षा परिषदेकडे

‘हमास’ने व्हिडीओ जारी केला असून, यामध्ये त्यांनी दहा ज्यू धर्मीयांची हत्या केल्याचा दावा केला आहे. इस्रायली सैनिकांनी या व्हिडीओची खातरजमा केली आहे. ‘हमास’च्या दहशतवाद्याने सोशल माध्यमातून हा व्हिडीओ त्याच्या पालकांना पाठविला आहे. दहा ज्यूंना मी ठार केले असल्याचे त्याने संभाषणातून सांगितले आहे.

Back to top button