Pune News : ‘काय लपवू, कुठं लपवू’ची पंचाईत संपता संपेना! | पुढारी

Pune News : ‘काय लपवू, कुठं लपवू’ची पंचाईत संपता संपेना!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फरासखाना आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जुगारअड्डे लुटीचा व्हिडीओ बाहेर कसा आला, हे शोधण्यात आता पोलिस व्यस्त आहेत. त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांपासून ते गुन्हे शाखेच्या पथकाने कंबर कसल्याची माहिती आहे. मात्र, वेळीच कारवाई करून गुन्हे दाखल केले असते, तर ही वेळच आली नसती, याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा. स्थानिक पोलिस ठाणे आणि तेथील वसुली पंटर यांच्या कृपाशीर्वादानेच हे जुगारअड्डे सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना नेमके अभय कोणाचे, हे शोधणे गरजेचे आहे.

लुटीच्या प्रकारामुळे या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस जुगारअड्डे सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांची खरी पंचाईत झाली. आता व्हिडीओच असल्यामुळे तेथे तसे काही सुरू नव्हते, असे म्हणण्याचीसुद्धा अडचण झाली. मध्यवस्तीत धारदार शस्त्रे घेऊन चोरटे लूटमार करतात, हा प्रकार गंभीर आहे. खरेतर हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करणे गरजेचे होते.

मात्र, त्यांनी तसे न करता, व्हिडीओ लपवून पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्यात आपली धन्यता मानली. या घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली. त्यासाठी जुगारअड्ड्यातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केले. मात्र, तरीदेखील व्हिडीओ समोर आले आणि जुगारअड्डे लुटीचा प्रकार चव्हाट्यावर आला.

दरम्यान, दै. ’पुढारी’ने ’जुगारअड्डा लुटला गुन्हेगारांनी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून पोलिसांचा कारभार उजेडात आणला. त्यानंतर तत्परता दाखवत दोन गुन्हे दाखल करून काही संशियांना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल करताना व्हिडीओ गेम पार्लर, असा त्याचा उल्लेख केला. लुटीचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये चोरटे तलवार, पिस्तूल आणि कुर्‍हाडीच्या धाकाने जुगारअड्ड्याच्या गल्ल्यातील रोकड लुटताना दिसून येत आहेत. शिवाय जुगार सुरू असल्याचेसुद्धा कमेर्‍यात कैद झाले आहे. मात्र, प्रश्न जुगारअड्ड्यांचा असल्यामुळे पोलिसांनी ’तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली. शेवटी व्हायचे तेच झाले. एवढी खबरदारी घेतली असतानादेखील लुटीचे व्हिडीओ व्हायरल झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आता एवढ्यावर न थांबता हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेच कसे? हे शोधण्यात दंग आहेत. त्यासाठी त्यांनी विविध सोर्स कामाला लावल्याची माहिती आहे. मात्र, कदाचित त्यांनी येथे ताकद लावण्यापूर्वी जर अवैधपणे पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेले जुगार अड्डे बंद करण्याचे कष्ट घेतले असते तर लुटीचा हा प्रकारच घडला नसता अन् व्हिडीओ बाहेर येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता.

हेही वाचा

मातामृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांना प्रशिक्षण

मोऱ्या चित्रपट : सफाई कामगार ते सरपंच-सीताराम जेधेचा चित्रपट लवकरच भेटीला

नागपूर : मोबाईल न दिल्याने मुलाने केली आईची हत्या

Back to top button