प्रभू श्रीरामांवर एनिमेशन मालिका हा स्तूत्य उपक्रम : के. कोटेश्वर शर्मा | पुढारी

प्रभू श्रीरामांवर एनिमेशन मालिका हा स्तूत्य उपक्रम : के. कोटेश्वर शर्मा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांची आज्ञा मानून १४ वर्षांचा वनवास भोगला. अयोध्येची हाती आलेली सत्ता एका क्षणात सोडून दिली. श्रीरामांच्या त्यागाची ही कथा नव्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमगण्यासाठी प्रभू श्रीरामांवर एनिमेशनच्या मालिका साकारण्याचा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे सहसरचिटणीस के. कोटेश्वर शर्मा यांनी केले.

मारा क्रिएशन्सच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या श्रीमन राम एनिमेशन मालिकेचे अनावरण शर्मा यांच्या हस्ते झाले. दिल्लीच्या आकाशवाणी भवनातील सभागृहात हा समारंभ पार पडला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर, मारा क्रिएशन्सच्या सीईओ भारवी कोदवंटी, श्रीराम जोशी, राजेश यादव याप्रसंगी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले की, आधीच्या पिढीत आजी-आजोबांकडून आपल्याला रामचरित्राच्या कथा ऐकायला मिळत होत्या. त्यातून प्रभू श्रीरामांचे संपूर्ण चरित्र, वडिलांची आज्ञा मानन्यासाठी त्यांनी केलेला सत्तेचा त्याग, या सर्व गोष्टींची माहिती मिळत होती. या माहितीतून अनेक पिढ्या घडत गेल्या. आता नवीन तंत्रज्ञानातून सध्याच्या पिढीला रामायण कळण्यासाठी अशा पद्धतीच्या एनिमेशन मालिका तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारले असताना प्रभू श्रीरामांवर एनिमेशन मालिका साकारली, हा सुंदर योगायोग असल्याचे सांगून सुनील देवधर यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या कार्यक्रमाला मान्यवरांसह असंख्य प्रेक्षक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button