शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांचे आंदोलन | पुढारी

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांचे आंदोलन

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शनिवारी (दि.15) रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे-निदर्शने आंदोलन करण्यात आले. शिक्षकांना शिकवू द्या, मुलांना शिकू द्या, अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे जिल्हापरिषेदेच्या शाळांतील शिक्षकांची संख्या कमालीची कमी होणार आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होईल. तसेच वेळी-अवेळी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कामांच्यामुळे आणि दैनंदिन शालेय कामकाज करतानाच घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन मीटिंगमुळे रोजच्या अध्यापन कार्यात अडथळे येतात.

या आहेत प्रमुख मागण्या

  • 15 मार्च 2014 चा संचमान्यता निर्णय रद्द करा.
  • शिक्षक गणवेश सक्ती रद्द करा.
  • नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी शिक्षकांना देऊ नये.
  • ऑनलाईनसह अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये.

विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश योजनेत केलेला बदल हा विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी मनस्ताप येणार आहे. अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असून त्याकडे शासनाची दुर्लक्ष आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातत्याने शासनाकडे याबाबत गाऱ्हाणे मांडत आहे. आपल्या धोरणात सकारात्मक बदल करण्याची विनंती करत आहेत. मात्र शासन प्रशासन याबाबतीत कुठेही गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी आंदोलन करावे लागत आहे, असे विजय कोंबे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनप्रसंगी तक्रार निवारण परिषदेचे प्रवर्तक अजय भोयर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे, विभागीय उपाध्यक्ष अजय मोरे, शिक्षक नेते रामदास खेकारे, जिल्हाध्यक्ष अजय बोबडे, चंद्रशेखर ठाकरे, रविंद्र राठोड, अतुल उडदे, राकेश साटोणे, संतोष डंभारे, यीगाराम कराळे, प्रदीप देशमुख, प्रशांत ढवळे, शशीमोहन थुटे, सुरेश ढोले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यांच्या सर्व मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button