मातामृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांना प्रशिक्षण | पुढारी

मातामृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांना प्रशिक्षण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर राज्यात मातामृत्यूच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मातामृत्यूमागील कारणांचे विश्लेषण करून संख्या कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग आणि कुटुंबकल्याण कार्यालयातर्फे राज्यातील स्त्रीरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून मातामृत्यूसंदर्भात धोरण आखण्यास मदत होणार आहे.

कुटुंबकल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. पी. एन. गांडल म्हणाले, की पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञांना मातामृत्यूंविषयी प्रशिक्षण देण्यात आले. केंद्र सरकारच्या नोंदीनुसार, मातामृत्यू नियंत्रणात केरळच्या खालोखाल महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. राज्यातील प्रमाण आणखी आटोक्यात आणण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासन संचालित प्रसूती केंद्रांतील तज्ज्ञ कार्यशाळेत सहभागी झाले होते.

मातामृत्यूची नोंद झाल्यानंतर 24 तासांच्या आत मृत्यूची तत्काळ माहिती राज्य आणि केंद्राला दिली जाते. यासाठी जलद प्रतिसाद पथक आणि सुविधा नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. डॉक्टरांनी मृत्यूचे तत्काळ कारण लक्षात घ्यावे आणि ते शक्य नसल्यास मृत्यूचे संभाव्य कारण लक्षात घेणे आवश्यक आहे. महिला गर्भवती असताना केवळ रुग्णच नाही, तर नातेवाइकांचेही समुपदेशन केले पाहिजे, जेणेकरून मातेला वेळेत रुग्णालयात आणता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा

झंडुगाेळी खाऊन संजय राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे

‘या’ देशात पेंग्विन बनला मेजर जनरल!

सर्वात महागडा दुर्गा मंडप, गिनिज बुकमध्ये नोंद

Back to top button