शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : संदीप लोखंडे मृत्यूप्रकरणी पुलाची शिरोली येथील हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर शनिवारी (दि.१५) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हॉटेल प्रिन्सचे मालक विकास सर्जेराव जाधव व तेथील वेटर बापू वाघी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला. शिवाय या गुन्ह्याचा तपासही करवीरचे डिवायएसपी सुजितकुमार शिरसागर यांच्याकडे देण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संदीप मारुती लोखंडे हा पुलाची शिरोली येथील हॉटेल प्रिन्समध्ये नोकरी करत होता. १० ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे तो बाथरूमला गेला होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला. याबाबत संदीपचा भाऊ सागर मारुती लोखंडे यांनी हा अपघाती मृत्यू नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली होती, मात्र संदीपला औषधे चालू असल्याने तो आजारी होता. आणि त्यामुळेच बाथरूममध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी हॉटेल मालक व कामगारांकडून सांगण्यात आले होते. सागर लोखंडे यांनी याबाबत पोलिस दिशाभूल करत असल्याचे सांगत थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यातंर्गत हॉटेल मालक व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार दोघांवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर हे पुढील तपास करत आहेत.