Railway news : रेल्वे प्रशासन झाले दक्ष; अभियांत्रिकी, ‘रेल्वे सुरक्षा’ संयुक्तरित्या घालणार गस्त | पुढारी

Railway news : रेल्वे प्रशासन झाले दक्ष; अभियांत्रिकी, ‘रेल्वे सुरक्षा’ संयुक्तरित्या घालणार गस्त

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान काही अज्ञातांनी रेल्वे रूळावर दगड ठेवण्याची घटना शुक्रवार (दि. 6) दुपारी घडली; मात्र रेल्वे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासन आणखी दक्ष झाले असून, अभियांत्रिकी आणि सुरक्षा विभाग आता रूळ मार्गाच्या सुरक्षिततेसाठी संयुक्तरित्या गस्त घालणार असल्याची माहिती रेल्वे विभाकडून देण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याघटनेबाबत परिसरातील नागरिकांना माहिती असल्यास रेल्वे प्रशासनाला कळविण्यात यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

‘कॉरिडॉर ब्लॉक’वेळी केलेले कृत्य

दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान गाड्यांची ये-जा कमी असते ती वेळ म्हणजे ‘कॉरिडॉर ब्लॉक’ या वेळी अभियांत्रिकी कर्मचार्‍यांची रूळाची तपासणी झाल्यावर अज्ञात व्यक्तीने रूळावर दगड ठेवल्याची माहिती समोर आली आहे. अभियांत्रिकी विभागाकडून रूळाची पाहणी चोवीस तासांमधून तीन ते चार वेळा केली जाते. यामध्ये रूळाला तडे जाणे, नट-बोल्ट आणि क्लिपची पाहणी करणे तसेच रूळाजवळील वस्तू बाजूला हटविल्या जातात. रूळाची तपासणी झाल्यावर बराच वेळ अप-डाऊन मार्गे कुठलीच गाडी गेली नाही याचा गैरफायदा घेत हे कृत्य करण्यात आले आहे.

गार्डच्या दक्षतेने टळला अपघात

गार्डची ज्या गाडीवर नेमणूक करण्यात आली, त्या गाडीच्या देखभाल ही त्याची प्रथम जबाबदारी असते. त्याच बरोबर शेजारील रूळावर लक्ष देणे हीदेखील अधिकची जबाबदारी त्या गार्डवर असते. त्यानुसार लोणावळ्यावरून पुण्याकडे जाणार्‍या गार्डच्या लोणावळा अप मार्गाकडे जाणार्‍या रूळावरील दगड निर्दशनास आले, त्यामुळे संभाव्य अपघात टळला आहे.

रेल्वे अधिनियमाच्या कलम 150 अंतर्गत गुन्हा दाखल

संबंधित घटनेबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेल्वे अधिनियम कलम 150 अंतर्गत अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानुसार ओरापीस जन्मठेप अथवा दहा वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.

रुळावर दगड ठेवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

पुणे-मुंबई लोहमार्गावर दगड ठेवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी शैलेंद्र अवधेश त्रिपाठी, यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी ट्रॅकमॅन इर्शाद शेख, अनिरुद्ध शिंदे, तौफिक शेख, गणेश निंबाळे, शरद देशमुख हे रेल्वे रुळाची नियमित पहाणी करीत होते. त्या वेळी कोणीतरी खोडसाळपणे जीविताला हानी होण्याच्या उद्देशाने चिंचवड ते आकुर्डीदरम्यान रुळावर दगड ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेल्वे कर्मचार्‍यांनी वेळेत दगड हटवल्याने मोठी दुर्घटना टळली. अज्ञातांवर भारतीय रेल्वे अधिनीयम 1989 कलम 150 (1) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

German university : आदरातिथ्याने भारावले जर्मन विद्यापीठाचे संशोधक

Pimpri News : पिंपरीतील इमारतींच्या फायर ऑडिटकडे कानाडोळा

संगमनेर : भोजापूर चारी फोडल्याने शेतकरी संतप्त!

Back to top button