संगमनेर : भोजापूर चारी फोडल्याने शेतकरी संतप्त! | पुढारी

संगमनेर : भोजापूर चारी फोडल्याने शेतकरी संतप्त!

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भोजापूर पाटचारीचे पाणी सोनेवाडी गावाच्याखाली निघाले, मात्र पळसखेडे गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी पाण्याची चारी फोडल्यामुळे भोजापूर पाटपाणी समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. पाणी फोडणार्‍यांवर भोजापूर जलसंपदा विभागाने तत्काळ गुन्हे दाखल करावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा समितीने दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पळसखेडे, कर्‍हे, सोनेवाडी, निमोण, पिंपळे, सोनोशी, नान्नज दुमाला, काकडवाडी, पारेगाव खुर्द व धनगरवाडा मार्गे तीगाव टेलपर्यंत दुष्काळी भागाला भोजापूर पाटचारीचे पाणी मिळालेच पाहिजे, या हक्काच्या मागणीसाठी गावांमधील शेतकर्‍यांनी एकत्र येत भोजापूर पाटपाणी कृती समिती स्थापन केली. शासनाविरोधात गावोगाव बैठका घेत या परिसरातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर शेतकर्‍यांच्या आक्रमकपणापुढे हात टेकवत भोजापूर पाटचारीला पाणी सोडण्यात आले आहे.

भोजापूर पाटचारीचे पाणी जाण्यास जेथे अडचणी येत होत्या, तेथे जेसीबीच्या साह्याने शेतकर्‍यांनी अडथळे दूर करीत भोजापूर धरणातून चाचणी घेण्यासाठी 60 क्युसेसने पाणी पाटचारीला सोडण्यात आले. पाणी पळसखडे, कर्‍हे, निमोण, सोनेवाडीमार्गे पिंपळे, सोनोशी, वाटमादेवी मंदिरापर्यंत सायंकाळपर्यंत पोहण्याचा अंदाज होता.

दरम्यान, पळसखेडे भागात या पाटचारीचे पाणी कोणी फोडले, त्याची जलसंपदा विभागाने चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे, अन्यथा भोजापूर पाटपाणी कृती समिती पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा भोजापूर पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग फड, सचिव बबन घुगे, समितीचे पदाधिकारी, काकडवाडीचे उपसरपंच जनार्धन कासार, निमोनचे सरपंच संदीप देशमुख, पारेगावचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक सखाराम शेरमाळे, पिंपळेचे उपसरपंच तुकाराम चकोर, नान्नज दुमालाचे सरपंच भाऊसाहेब कडनर, सोनूशीचे सरपंच राजू सानप, ज्ञानेश्वर सानप, गणेश दिघे, रामदास दिघे यांच्यासह परिसरातील लाभधारक शेतकर्‍यांनी दिला आहे.

जेसीपीच्या साह्याने पाणी बंद केले..!

पाणी नान्नज दुमालाच्या दिशेने मार्गस्थ झाले, मात्र अचानक अज्ञात व्यक्तींनी पळसखेडे शिवारात भोजापूर पाटचारी क्र. 3 वर पोल्ट्रीजवळ पाणी फोडले. यामुळे पुढे जाणार्‍या पाण्याचा विसर्ग कमी झाला. ही बाब कृती समितीच्या शेतकर्‍यांच्या लक्षात आल्याने कार्यकर्त्यांनी चारी फोडलेल्या ठिकाणी जाऊन जेसीपीच्या साह्याने पाणी बंद केले.

हेही वाचा

Chandrakant Patil : नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करा ! चंद्रकांत पाटलांची शिक्षणमंत्र्यांना पत्र

Israel-Hamas conflict : इस्रायल-हमासच्या युद्धात आतापर्यंत ६१० हून अधिक ठार

Asian Gold Medal : अस्लमच्या रुपात नगरला आशियाई सुवर्णपदक

 

Back to top button