तिसरी कुरकुंभ मोरीदेखील गळकीच ! | पुढारी

तिसरी कुरकुंभ मोरीदेखील गळकीच !

उमेश कुलकर्णी

दौंड : दौंड शहरातील तिसरी कुरकुंभ मोरी होण्यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चे, धरणे, आंदोलने, रेल रोको, रास्ता रोको असे मार्ग अवलंबिले. सन 2014 मध्ये सुरू झालेल्या या मोरीचे काम जवळपास साडेसात वर्षांनी रडतखडत का होईना पूर्ण झाले. परंतु, 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेल्या या मोरीची अवस्थादेखील पहिल्या मोरीप्रमाणेच झाली आहे. ही मोरीदेखील गळकी असून, यामध्ये पाणी साठत आहे. मुळातच या तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले आहे. ही मोरी नागरिकांच्या रेट्यानंतर रेल्वे प्रशासनाने विनाउद्घाटन सुरू केली. सुरुवातीपासूनच या मोरीत गळती सुरू आहे. पावसाळ्यात तर या मोरीबद्दल बोलायलाच नको.
रेल्वे प्रशासनाने या मोरीचे काम सुरू असताना अनेक तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही मोरी अनेक ठिकाणी गळत आहे. या मोरीच्या तोंडालाच गटाराचे सांडपाणी साचून राहते. रेल्वे प्रशासन काम केल्याचा आव आणते; परंतु पुन्हा दोन दिवसांनी ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे या मोरीत पाणीच असते.

खासदारांचे मोघम उत्तर
याबाबत खा. सुप्रिया सुळे यांना विचारले असता, तुम्ही बातमी छापा. मी रेल्वे प्रशासनाला पत्र देते, एवढे मोघम उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली.

राष्ट्रवादीचे नेते आता गप्प
तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतत पुढे असायचे. परंतु, आता हे राजकीय नेते मात्र गप्प झाले आहेत. या विषयावर ते आता काहीही बोलायला तयार नाहीत. एकंदरीत, या मोरीवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याची चर्चा दौंड शहरात आहे.

हेही वाचा :

Back to top button