मतदान यंत्रे बंद पडल्याने नागरिकांची नाराजी; बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकार | पुढारी

मतदान यंत्रे बंद पडल्याने नागरिकांची नाराजी; बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यंदा बारामती मतदारसंघात येणार्‍या बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर आणि खडकवासला या विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच नंतरही मतदारांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. याशिवाय अनेक मतदारांचे मतदान केंद्र घरापासून दूर आणि बदललेली असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी दिसून आली.

दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने सव्वा तास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. बिघाड होण्यापूर्वी 31 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी सव्वा सातच्या सुमारास मतदान यंत्र बंद पडले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांसह इतर मतदारांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक मतदार माघारी गेले. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. तसेच भोर तालुक्यातील भांबवडे येथील मतदान केंद्र क्रमांक 455 येथे सकाळी सुरूवातीचे पाच मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र बंद पडले. तब्बल दीड तासानंतर मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

याबाबत माहिती देताना बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी म्हणाल्या, ’प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार्‍या चाचणी मतदानात 49 बॅलेट युनिट, 18 कंट्रोल युनिट, तर 31 व्हीव्हीपॅट तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेत 15 बॅलेट युनिट, पाच कंट्रोल युनिट आणि 23 व्हीव्हीपॅट बंद पडले. मतदान यंत्रे बारामती, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, दौंड, इंदापूर आणि खडकवासला अशा सहा विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रांवरील बंद पडले होते. त्यामुळे ही मतदान यंत्रे बदलून मतदान सुरळित करण्यात आले.’

सायंकाळी पाचनंतरही मतदारांच्या रांगा

बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघात अनेक मतदारांची नावे मतदारयादातून वगळण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांनी आपले नाव यादीत शोधण्यासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक मतदारांची नावे घरापासून दूर आणि बदलण्यात आली असल्याच्या तक्रारी आल्या. तसेच बारामतीमधील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, खडकवासला आणि भोर या विधानसभा मतदार संघातील विविध केंद्रांवर सायंकाळी पाचनंतरही मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी चांगली होती. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारी बारा ते चार या वेळेत मतदार घराबाहेर पडले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदार हे मतदानासाठी उशीराने बाहेर पडले. परिणामी सायंकाळी पाचनंतरही विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.

– कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी

हेही वाचा

Back to top button