हिंजवडी : बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल | पुढारी

हिंजवडी : बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल

हिंजवडी(पुणे) : भाताचे आगार असलेल्या मुळशी, मावळ परिसरात सध्या इंद्रायणी या लोकप्रिय भाताच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. मावळसह मुळशीतही बोगस बियाण्यांमुळे वेळेआधीच भाताच्या ओंब्या फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला असून, वर्षातून एकदाच येणार्‍या भातपिकाचे मोठे नुकसान होत आहे.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

कासारसाई (ता. मुळशी) येथील हनुमंत कलाटे यांचे सुमारे दीड एकर क्षेत्रात असलेल्या भातपिकास याचा मोठा फटका बसला आहे. जुलै महिन्यात लागवड झालेले भातपीक केवळ दीड-दोन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच फुटवा होण्याच्या कालावधीतच भातपिकास ओंब्या फुटू लागल्या आहेत. परिणामी याचा उत्पन्नावर फार मोठा परिणाम होणार आहे. याचे पंचनामे अद्यापही झाले नाहीत. त्यामुळे याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बोगस बियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

शेजारील मावळच्या कुसगाव नामा गावातल्या शेतकर्‍यांनी महाबीजचं इंद्रायणी तांदळाचं बीज शेतात पेरले होते. मात्र, भाताची लागवड होऊन त्याला फुटवे फुटायला लागल्यावर हे बीज निकृष्ट असल्याचे आढळले. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून वाढवलेले पीक एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतचे पंचनामे होऊनही बोगस बियाणं विकणार्‍यांवर अद्याप कारवाई झाली नाही. शेकडो एकर भाताची लागवड परिसरात केली जाते. त्यामुळे भविष्यात या प्रकारचे बियाणे किती शेतकर्‍यांना विकले गेले आहे, आणि यामुळे किती नुकसान होणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष आहे. बोगस बियाणे विक्री करणार्‍या आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई न करणार्‍या कृषी अधिकारी आणि दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

अधिकार्‍यांची उडवाउडवीचे उत्तरे

चौकशी सुरू असल्याचे ठोकळेबाज उत्तर त्यांनी दिलं. तालुका कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती आणि काही भात संशोधक यांच्या टीमने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्याचे नमुने घेऊन हे सर्व प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे अनेक गरीब शेतकरी देशोधडीला लागले आहेत. महाबीजसारखे सरकारी बियाणेदेखील बोगस निघणार असेल तर शेतकर्‍यांनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं? अशा बोगस बियाणं विकणार्‍यांवर सरकार तातडीनं कारवाई करणार की नाही? हा खरा सवाल आहे.

इंद्रायणी भाताची वैशिष्ट्ये

पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्ह्यासह इतर भागात मागील काही वर्षांत इंद्रायणी वाणाच्या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. चवीला काहीसा गोड आणि चिकट असलेल्या या भाताची अल्पावधीतच शेतकरी आणि ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढली आहे. मावळ येथील वडगावच्या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव कळके यांनी 1987 मध्ये आय. आर. 8 आणि आंबेमोहर या दोन जुन्या भातातून संकरित इंद्रायणी या वाणाची निर्मिती केली होती.

हेही वाचा

Chandrapur Bribery Case: चिमूर तालुक्यातील दोघा सरपंचासह उपसरपंचास ४१ हजारांची लाच घेताना अटक

एक्साईजने डोंगर पोखरून काढला उंदीर; कारवाईचा नुसताच गाजावाजा

पिंपरी : बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील जखमींना नोकरी देण्यास शासनाचा नकार

Back to top button