सांगली: खरसुंडी येथे जनावरांच्या बाजारात ५ कोटींची उलाढाल | पुढारी

सांगली: खरसुंडी येथे जनावरांच्या बाजारात ५ कोटींची उलाढाल

प्रशांत भंडारे

आटपाडी :  खरसुंडी (ता.आटपाडी) येथील खिलार जनावरांच्या यात्रेत तब्बल पाच कोटींची उलाढाल झाली. पौष यात्रे नंतर चैत्र यात्रेत देखील मोठी उलाढाल झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. खरसुंडी येथील माणदेशी खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी तीन राज्यात प्रसिध्द आहे. हौशी शेतकरी जनावरांना सजवून हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात यात्रेत सहभागी झाले होते.  शेतकऱ्यांचा उत्साह आणि जनावरांच्या मोठ्या संख्येने खरसुंडी येथील माळरानाचा परिसर गजबजला होता.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी आणि व्यापारी देखील या यात्रेत सहभागी झाले होते. खरसुंडी ते झरे रस्त्यावर ही यात्रा भरवण्यात आली. यात्रेत सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी आली होते. पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील तसेच पर राज्यातील शेतकरी जनावरे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते.

यात्रेत खिलार गाई, लहान खोंड, प्रजोत्पादनासाठी आणि शर्यतीसाठी वापरले जाणारे वळू आणि शेती कामासाठी वापरले जाणारे बैल खरेदीसाठी मोठया प्रमाणात आले होते. यात्रेत तब्बल १५ ते २० हजार जनावरे दाखल झाली होती. माणदेशी जातिवंत खिलार जनावरे वैशिष्ट्यपूर्ण असतात. अत्यंत आकर्षक ही जनावरे चपळ आणि काटक असतात. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली किंमत मिळाली. खोंडांना देखील चांगली मागणी होती. खोंडांना २५ ते ५० आणि बैलांना ५० ते १.२५ लाख रुपयांचा दर मिळाला.

यात्रेत खरेदीनंतर जातिवंत खोंड आणि वळूची पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढल्या. ग्रामपंचायत आणि बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची आणि दिवाबत्ती व्यवस्था केली होती.

 प्रचंड उन्हाच्या तडाख्यातही मोठी यात्रा भरली. ३ तारखेपासून जनावरांची आवक सुरू झाली. १५ ते २० हजार जनावरे आली आहेत.

  • कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, सचिव शशिकांत जाधव

 

बैलगाडी शर्यतीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे खिलार बैल आणि खोंडांना मोठी मागणी आहे. हौशी शेतकरी आपली शर्यतीची हौस पुरवण्यासाठी जातिवंत जनावरांच्या शोधात असल्याने जनावरांना चांगला दर मिळाला.

सरपंच – धोंडीराम इंगवले

हेही वाचा 

Back to top button