वडिलांचा अपघातात मृत्यू… स्वत: ला अपंगत्व.. तरीही न्याय मिळवण्यासाठी तिने केला 9 वर्षं संघर्ष | पुढारी

वडिलांचा अपघातात मृत्यू... स्वत: ला अपंगत्व.. तरीही न्याय मिळवण्यासाठी तिने केला 9 वर्षं संघर्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दुचाकीवर वडिलांच्या पाठीमागे बसून मुलगी चालली असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिली. अपघातात वडील मृत्युमुखी पडले, मात्र 18 वर्षीय मुलीला 50 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आले. त्यानंतर ती नुकसान भरपाईसाठी न्यायालयाची पायरी चढली. अखेर, नऊ वर्षांच्या संघर्षानंतर लोकअदालतीत 40 लाख रुपये तडजोडीअंती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला.

2014 मध्ये नर्‍हे येथून वारजे रस्त्यावर मुलगी आणि वडील दुचाकीवरून चालले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचा दावा निकाली निघाला आहे. मात्र, मुलीच्या पायावरून ट्रकचे चाक गेले होते. वेळोवेळी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत असे. अपघातानंतर मुलगी स्वत:हून काम करू शकत नाही. तसेच तिला नोकरी सोडावी लागली. या प्रकरणात मुलीने मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला होता. वैद्यकीय बिल, मुलीला होणारा त्रास, ही परिस्थिती पाहता 75 लाख रुपये मिळण्याची मागणी या दाव्यात करण्यात आली.

मात्र, 40 लाखांवर तडजोड झाली. याविषयी मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले, की मागील अनेक वर्षांपासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. मात्र, लोकअदालतमुळे न्याय मिळाला. न्यायालयीन प्रक्रियेपासून सुटका होऊन वेळ वाचला. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य क्षीरसागर, अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर ही तडजोड झाली.

हे ही वाचा :

नाशिक : पूर ओसरला, गोदाघाटावर पसरली अस्वच्छता

एक लाख दावे निकाली काढून पुणे पुन्हा अव्वल

Back to top button