नाशिक : पूर ओसरला, गोदाघाटावर पसरली अस्वच्छता | पुढारी

नाशिक : पूर ओसरला, गोदाघाटावर पसरली अस्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाने उसंत घेतल्यावर गंगापूर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला आहे. त्यामुळे नदीपत्रालगतचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पूर परिस्थिती निवळल्यानंतर गोदाघाटावर अस्वच्छता पसरली असून, मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य परसले आहे. गोदेच्या पुरामुळे स्मार्ट सिटीची कामे उघडी पडली आहेत.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने उसंत घेतली. त्यामुळे गंगापूरच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने कपात करतानाच रविवारी (दि. १०) धरणाचे दरवाजे बंद केले गेले. त्यामुळे गोदाघाटावरील पूर परिस्थिती निवळली आहे. पूर ओसरल्यावर गोदाघाटावर ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असून, चिखलही साचला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना नाकाला रुमाल बांधून परिसरातून मार्गक्रमण करावे लागत आहे. महापालिकेने लवकरात-लवकर स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी व सामान्यांकडून होत आहे.

स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदाघाटावर विविध प्रकारची विकासकामे करण्यात आली. ठिकठिकाणी दगडी फरश्या बसविण्यात आल्या. पण गोदावरीच्या पहिल्याच पुराने स्मार्ट सिटीच्या ‘स्मार्ट कामांचे पितळ उघडे पाडले आहे. यशवंतराव महाराज पटांगण परिसरातील निळकंठेश्वर मंदिर येथे नव्याने बसविलेल्या फरश्या उखडल्या आहेत, तर सांडव्यावरच्या देवी मंदिराच्या मागील बाजूस केलेल्या कामांचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे स्मार्ट कामांच्या नावाखाली करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे.

विक्रेत्यांची लगबग

पूर ओसरल्यानंतर रविवारी (दि. १०) सकाळपासून गोदाघाटावरील विक्रेत्यांची लगबग पाहायला मिळाली. पुरामुळे हलविण्यात आलेल्या टपऱ्या मूळ जागी नेण्यासाठी टपरीधारकांची कसरत सुरू होती. काही ठिकाणी दुकानातील गाळ उपसण्याचे काम व्यावसायिकांकडून केले जात होते.

सेल्फीची मोह आवरेना

पूर ओसरल्यानंतर हळूहळू पाणी गोदापात्रात गेले. मात्र, दुपारपर्यंत यशवंतराव महाराज मंदिर व परिसरात पात्राबाहेर पाणी वाहात होते. त्यामुळे या पाण्यात उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह नागरिकांना आवरता आला नाही. शालेय विद्यार्थ्यांसोबत आबालवृद्धांनी पाण्यात उभे राहात त्यांच्या मोबाइलमध्ये आपले फोटो कैद केले.

हेही वाचा :

Back to top button