एक लाख दावे निकाली काढून पुणे पुन्हा अव्वल | पुढारी

एक लाख दावे निकाली काढून पुणे पुन्हा अव्वल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि. 9)भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एक लाख 10 हजार 192 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहे. त्यातून 396 कोटी दोन लाख 99 हजार 200 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल झाले आहे. एक लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढत पुण्याने आपला पहिला क्रमांक या वेळीदेखील कायम ठेवला आहे. दाखल व दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी 133 पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. या पॅनेलची संख्यादेखील राज्यात सर्वांधिक होती.

गेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित स्वरूपाचे 44 हजार 614 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 645 दावे निकाली काढण्यात आले. तर दाखलपूर्व स्वरूपाचे 10 लाख 22 हजार 119 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक लाख चार हजार 532 दावे निकाली काढण्यात आले आहेत. प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी लोकअदालतीचे आयोजन केले होते.

369 कोटी शुल्क वसूल
दाखलपूर्व स्वरूपाचे दोन लाख सहा हजार 86 दावे लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी 79 हजार 956 दावे निकाली काढण्यात आले. त्यातून 76 कोटी 21 लाख 94 हजार 253 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर 72 हजार 477 प्रलंबित प्रकरणांमधून 30 हजार 236 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात 319 कोटी 81 लाख 4 हजार 947 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

दाव्याचा प्रकार : निकाली दाव्यांची संख्या पुढीलप्रमाणे

बँकेची कर्जवसुली – 3 हजार 552
तडजोड पात्र फौजदारी गुन्हे -29 हजार 385
वीज देयक – 157
कामगार विवाद खटले – 71
भूसंपादन -103
मोटार अपघात दावे न्यायाधिकरण – 146
वैवाहिक विवाद – 285
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट – 2 हजार 212
इतर दिवाणी – 924
पाणी कर – 68180
ग्राहक विवाद – 18
इतर – 5186
एकूण – 1,10,192

हेही वाचा :

एकाच वर्षात 777 चित्रपट पाहण्याचा विश्वविक्रम

माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

Back to top button