चालकांनी स्वतःची आणि गाडीच्या आरोग्याची काळजी घ्यावी : अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील | पुढारी

चालकांनी स्वतःची आणि गाडीच्या आरोग्याची काळजी घ्यावी : अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अपघात रोखण्यासाठी खासगी बस मालकांनी आपल्या चालकांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासोबत चालकांनी देखील स्वतःची आणि गाडीच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. गाडीची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतल्यास नक्कीच अपघात रोखण्यास मदत होईल, असे मत राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 500 खासगी बस चालकांची शनिवारी पंडित भीमसेन जोशी सभागृह औंध येथे नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.

नेत्र तपासणीनंतर उपस्थित सर्व चालकांना मोफत चष्मे व आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचे वाटप करण्यात आले. यावेळी आपण परिवहन आयुक्त पाटील यांच्यासह पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, बोकीचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन , पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणी, कार्याध्यक्ष किरण देसाई, व अन्य उपस्थित होते.

पुढील पंधरा दिवस पुणे आरटीओ कार्यालयात मोफत नेत्र तपासणी….
वाढते अपघात रोखण्यासाठी खासगी बस चालकांच्या आरोग्याची आणि डोळ्यांची तपासणी शनिवारी औंध येथे झाली. अशीच तपासणी पुढील पंधरा दिवस संगम ब्रिज येथील पुणे आरटीओ कार्यालयात होणार आहे. यावेळी चालकांच्या डोळ्याची तपासणी केल्यानंतर त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येतील, त्याचा लाभ खासगी बसवरील चालकांनी आरटीओ कार्यालय येथे येऊन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

हेही वाचा : 

दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलिसांचे ‘टेन्शन’ वाढले

Pune Airport : पुणे विमानतळावर एस्केलेटर रॅम्पची सेवा; प्रवाशांना दिलासा

Back to top button