पुणे जिल्ह्यात मोर्चेबांधणीला ताईंची सुरुवात… दादांची कधी..? | पुढारी

पुणे जिल्ह्यात मोर्चेबांधणीला ताईंची सुरुवात... दादांची कधी..?

रामदास डोंबे

खोर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेल्याने पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद व संघटन उभे करून राष्ट्रवादीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा त्यांनी सुरू केला आहे. दौंड तालुक्यात सुळे यांनी 19 ऑगस्ट रोजी तब्बल 11 गावांचा दौरा केला. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे असणार, हे नक्की असल्याने त्यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

खा. शरद पवार यांच्या गटातून दौंड तालुक्यासाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांची उमेदवारी विधानसभा निवडणुकीसाठी निश्चितच मानली जात असल्याने खा. सुळे ह्या लोकसभेबरोबरच विधानसभा मतदारसंघदेखील मजबूत करताना दिसत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुसरा गट निर्माण करून फारकत घेतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अजूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बोलण्यास तयार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.

अजित पवार कधी पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा व बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आयोजित करणार यासाठी अजूनतरी ‘रेड सिग्नल’ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटातील कार्यकर्त्यांची ताकद कधी उभी करणार, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न चिन्ह आहे. अजित पवार गटामधून माजी आमदार रमेश थोरात यांची विधानसभेची उमेदवारी निश्चित आहे. अजित पवार मात्र यासाठी विधानसभेची मोर्चेबांधणी कधी आखणार, हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभेला आपल्या बहिणीला पाठिंबा देणार की सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भविष्यात आपला उमेदवार देणार, हीदेखील गणिते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अजित पवार ज्या भाजपसोबत आहेत, त्यांनी आजपर्यंत ‘आम्हीच बारामती लोकसभा जागा जिंकणार’ असा निर्धार केला असल्याने आगामी लोकसभा निवडणूक पवार कुटुंबीयाुसाठी काळजाचा ठोका चुकविणारी असणार आहे.

हेही वाचा

राजगुरूनगर : शासकीय वसुलीसाठी जमीन व्यवहारास हरकत घेणार्‍यास धमकी

वडगाव मावळ : शाळेला टाळे ठोकले अन शिक्षक झाले हजर

संगमनेरचा अशोक स्तंभ झाला 75 वर्षांचा!

Back to top button