संगमनेरचा अशोक स्तंभ झाला 75 वर्षांचा! | पुढारी

संगमनेरचा अशोक स्तंभ झाला 75 वर्षांचा!

शिवाजी क्षीरसागर

संगमनेर शहर(अहमदनगर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आहे. स्वातंत्र्याची स्मृती कायम रहावी, यासाठी अशोक स्तंभ उभारण्याचा संकल्प संगमनेरकरांनी केला. शहरातील नेहरू चौक येथे 15 ऑगस्ट 1948 ला 32 फुट उंच अशोक स्तंभ उभारण्यात आला. बहुधा देशातील पहिलाच अशोक स्तंभ उभारण्याचा मानही संगमनेरला मिळाला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी संगमनेरच्या नेहरू चौकात विविध मान्यवरांनी हजेरी लावली. पोलिस पथकासह अधिकारी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले हजर झाले. स्वातंत्र्याची धगधगती मशाल पेटावी तशी अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची स्मृती कायम स्मरणात राहावी अशी भावना व्यक्त केली. नेहरू चौकात तट्टया मारुती मंदिरा जवळ असलेल्या जागेत अशोक स्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसचे नेते भैय्यासाहेब कुलकर्णी, रावबहादूर परशरामी आणि इतर नेते मंडळींची भाषणे झाली. झेंडा वंदनानंतर अशोक स्तंभ उभारायच्या ठिकाणी कोनशिलेचा स्वातंत्र्य संग्रामात वेळोवेळी मदत करणार्‍या मुरलीधर जयरामदास मालपाणी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुरलीधर यांनी खास चांदीची थापी तयार करून आणली होती. या थापीने त्यांनी वाळू आणि चुन्याचे मिश्रण खोदलेल्या पायात टाकले.

अशोक स्तंभ उभारण्याचे ठरवले, तेव्हा गावातील कलाकार बाबुराव नाझर यांनी अशोक स्तंभ कसा असावा याचे रेखाचित्र तयार केले. देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होणार ही माहिती मिळताच बाबुराव नाझर यांनी आपल्या घरात पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांची चर्चा सुरु आहे. या प्रसंगांचे शाडू मातीचे अतिशय सुरेख शिल्प तयार केले होते. परिसरातल्या लोकांची हे शिल्प बघण्यासाठी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती. त्यांनी गावातल्या प्रतिष्ठितांशी चर्चा करून अशोक स्तंभ कसा असावा, याचे चित्र तयार केले. 23 फूट उंचीचे हे शिल्प कुठूनही बघितले तरी सारखेच दिसले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी शिल्पाचा आराखडा तयार केला.

नाझर यांनी तयार केलेले अशोक स्तंभाचे संकल्प चित्र घेऊन उमाजी पेंटर यांनी अशोक स्तंभाच्या कामाला सुरुवात केली. चारही बाजूने बांबूचे पहाड बांधून उमाजी आपले काम करीत होते. सुमारे सात ते आठ महिने हे काम सुरु होते. मोटार अड्ड्यावर जमा झालेली मंडळी हे काम बघण्यासाठी रोज गर्दी करायची. मुदतीपूर्वीच अशोक स्तंभ तयार झाला.

आपल्या कसबी हातांनी उमाजींनी त्याची रंगरंगोटी केली. या स्तंभाचे उद्घाटन 15 ऑगस्ट 1948 रोजी करायचे हे अगोदरच्या वर्षीच नक्की झाले होते. नामदार हरिभाऊ पाटसकर यांनी अशोक स्तंभाच्या उद्घाटन समारंभाला येण्याचे मान्य केले. त्यानुसार उत्साहात हा समारंभ पार पडला. कदाचित स्वातंत्र्योत्तर काळात देशात उभारलेला हा पहिला अशोक स्तंभ असावा. अशी माहितीही इतिहास संशोधन यांनी दिली. नेहरु चौकात अशोक स्तंभाच्या साक्षीने पुढील सुमारे पन्नास वर्षे देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. स्वातंत्र्याच्या इतिहासाची साक्ष असलेले अशोक स्तंभ आज मात्र आतिक्रमनाने वेढला गेला आहे.

नेहरू चौकात भाजीपाला, धान्य व इतर सामानाची दुकाने थाटली गेली आणि इथूनच देशाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाची हेळसांड सुरु झाली. कधी काळी तारेचे पक्के कंपाऊंडच्या आत लावलेली फुलझाडे हळूहळू नाहीशी झाली. नव्या पिढीतील अनेकांना गावात असा काही अशोक स्तंभ आहे हे माहितही नसेल. या वर्षी हा अशोक स्तंभ 75 वर्षांचा होतोय. आपला अमृतमहोत्सव साजरा करतोय. या अमृतमहोत्सवी हा स्तंभाला मोकळा श्वास घेऊ देऊ, अशी अपेक्षा बाळगूया.

– डॉ. संतोष खेडलेकर, इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष.

हेही वाचा

पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी : विनाहेल्मेटधारकांना नोटिसा; 7 महिन्यांत 4000 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा

नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला वेग, अत्यावश्यक पदभरतीचीच शिफारस करण्याचे आयुक्तांचे निर्देश

Back to top button