वडगाव मावळ : शाळेला टाळे ठोकले अन शिक्षक झाले हजर | पुढारी

वडगाव मावळ : शाळेला टाळे ठोकले अन शिक्षक झाले हजर

वडगाव मावळ(पुणे) : पवन मावळ भागातील शिळिंब येथे दोन महिन्यांपासून एकच शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळत असल्याने तात्काळ शिक्षकांची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देऊनही अखेर शिक्षक न आल्याने ग्रामस्थांनी सोमवारी शाळेलाच टाळे ठोकले. त्यानंतर शिक्षक हजर झाले व शाळा सुरू करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शिळिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाची 15 जून रोजी बदली झाली आहे. त्यामुळे एकाच शिक्षकाला पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सांभाळावे लागत होते. संपूर्ण शाळाच सांभाळावी लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे नवीन शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी
केली होती.

पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

यासंदर्भात मावळ तालुका भाजपचे उपाध्यक्ष शत्रुघ्न धनवे यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. तरीही शिक्षक मिळत नसल्यामुळे अखेर आज त्यांनी ग्रामस्थांसह जाऊन शाळेला टाळे ठोकले. त्यानंतर काही वेळातच शिक्षण विभागाकडून तात्पुरते एक शिक्षक शाळेवर पाठविण्यात आले. ते शाळेत हजर झाल्यावर ग्रामस्थांनी शाळेला ठोकलेला टाळा काढला.

आता शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून नवीन शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षकांची पुन्हा बदली करू नये; अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

– शत्रुघ्न धनवे,
उपाध्यक्ष, भाजप

हेही वाचा

पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती

नवी सांगवी : वळणावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती

संगमनेरचा अशोक स्तंभ झाला 75 वर्षांचा!

Back to top button