देहूगाव : अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाई थंडावली | पुढारी

देहूगाव : अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाई थंडावली

देहूगाव(पुणे) : देहूगाव नगरपंचायत हद्दीत 21 हून अधिक होर्डिंग्ज होते. त्यापैकी दहा ते बारा होर्डिंग्ज एकदम धोकादायक होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी देहूगावातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली होती; परंतु पालखी सोहळ्यानंतर पुन्हा कारवाई थंडावलेली दिसत आहे.

देहूगाव अनधिकृत होर्डिंग्जच्या विळख्यात या मथळ्याखाली दैनिक पुढारीमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रभारी मुख्य कार्यकारी डॉ. प्रवीण निकम यांनी तत्काळ संबंधित होर्डिंग्जमालकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर अशा अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई करण्यात सुरुवात केली होती.

प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष

परंडवाल चौक ते वडाचा माळ ते विठ्ठलनगर बायपास लगत असणारे काही होर्डिंग्ज जमीनदोस्त केले होते. त्याचवेळी सर्व होर्डिंग्जवर कारवाई करणे आवश्यक होते. वडाचा माळ ते अभंग इंडलिश मीडियम स्कूलदरम्यान असलेले होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. परंतु, जैन मंदिरापासून विठ्ठलनगर दरम्यानच्या देहू-आळंदी रत्याच्या दुतर्फा असलेले धोकादायक होर्डिंग्ज आजही तसेच उभे आहेत. त्यातील देहू पेट्रोलपंप आणि पंपासमोरील होर्डिंग्ज अतिशय धोकादायक आहेत. प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उर्वरित अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई का नाही?

देहू नगरपंचायतीने अशा सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर त्याचवेळी धडक कारवाई करणे अपेक्षित होते; पण या कारवाईत कुठे माशी शिंकली आणि ही कारवाई थांबविण्यात आली हे नागरिकांना अद्याप समजले नाही. त्यामुळे ज्यांच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली ते आता उर्वरित अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

होर्डिंग्ज काढण्याची मागणी

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूत परतण्यापूर्वी उर्वरित होर्डिंग्जवर कारवाई करणे महत्त्वाचे होते. पालखी सोहळा परतीस येऊन एक महिना होत आला आहे. तरी नगरपंचायतीने उर्वरीत धोकादायक होर्डिंग्जवर काढण्याबाबत कारवाई केली नाही. आता एखादे होर्डिंग्ज कोसळून जीवितहानी होण्याची वाट नगरपंचायत पाहत आहे काय? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वी अनत्तधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सांगाडे अद्याप तसेच

परिसरातील अनेक होर्डिंग्ज पाडली गेली आहेत. परंतु, त्यांचे सांगाडे आजही जागेवरच पडून आहेत. हे होर्डिंग्जचे सर्व साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे देहू नगरपंचायतीने निश्चित केले होते. परंतु, त्याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही आणि होर्डिंग्ज मालकांनीदेखील ते साहित्य हटविले नाही.

हेही वाचा

देहूगाव : दोन लाख वारकर्‍यांना अन्नदानाचा लाभ

नेते राजकीय डावपेचांमध्ये; शेतकर्‍यांचे प्रश्न अडगळीत

नवी सांगवीतील बसस्थानकावर झाड पडल्याने नुकसान

Back to top button