म्हसे येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला | पुढारी

म्हसे येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला

टाकळी हाजी (पुणे ): पुढारी वृत्तसेवा :  म्हसे (ता. शिरूर) येथील 65 वर्षीय महिलेवर शनिवारी (दि.19) बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. लघुशंकेसाठी सायंकाळी 7 च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या तुळसाबाईवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. त्यांना तत्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

बेट भागातील जांबूत, पिंपरखेड या भागांत बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात पुन्हा म्हसे येथे बिबट्याने हल्ला केल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. हल्ला झाल्यावरच पिंजरा लावला जात आहे. वनविभाग हलगर्जीपणा करीत असून, परिसरात जनजागृती करीत नाही, असा तक्रारीचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. गेली दोन वर्षांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. पशुधनासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून, बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पिंजर्‍यांची संख्या वाढवून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी म्हसे गावचे सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार यांनी केली आहे.

हेही वाचा :

पुणे : रुंदीकरणासाठी डेरेदार वृक्षांची कत्तल !

पिंपरी : रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळे अपघाताला निमंत्रण

Back to top button