पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघात विजय मिळविल्यानंतर एक जागा रिक्त झाल्यावर त्याठिकाणी प्रियांका गांधी-वधेरा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील एक्सवर केलेल्या पोस्टमधून प्रियांका गांधी-वधेरा आगामी काळात पोटनिवडणूक लढवून संसदेत पोहोचणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी-वधेरा यांनी जोरदार प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक खोट्या गोष्टींचे खरे उत्तर दिले आहे.
प्रियांका गांधी-वधेरा यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बोलतीच बंद झाली असल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रियांका गांधी वधेरा यांना केवळ त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता सर्वत्र प्रचारासाठी पाठवले आहे. प्रियांका गांधी-वधेरा कुठलीही पोटनिवडणूक लढवून संसदेत पोहोचू शकतात, असेही रमेश यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यावरून आगामी काळात प्रियांका गांधी वधेरा पोटनिवडणूक लढवतील, असा तर्क लावला जात आहे. अमेठीत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांना वायनाडने साथ दिली होती. त्यामुळे राहुल गांधी वायनाड सोडणार नाहीत, असा अंदाज आहे.
रायबरेली मतदारसंघात प्रियांका गांधी-वधेरा यांचे आजोबा फिरोज गांधी, आजी इंदिरा गांधी, मामी शीला कौल, आई सोनिया गांधी खासदार राहिल्या होत्या. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून प्रियांका गांधी-वधेरा रायबरेलीचीच निवड करतील, असे बोलले जात आहे.