

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह भाविक, नागरिकांची वर्दळ असलेल्या एनडीए-बहुली रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंचे डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे हिरवाईने बहरलेला रस्ता आत उजाड झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अनेक वृक्ष शंभर ते दीडशे वर्षे जुने होते. तोडलेल्या वृक्षांचे बुंधे रस्त्याच्या कडेला तसेच पडून आहेत. त्यांच्या बाजूला पुनर्रोपण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सुरुवातीला शंभराहीन अधिक झाडे तोडण्यात आली. त्यानंतर पुन्हा जून महिन्यात पन्नासहून अधिक झाडांची तोड करण्यात आली. सांगरुण ते मांडवी बुद्रुक यादरम्यानच्या रस्त्यावर अनेक डेरेदार वृक्ष होते. तसेच कुडजे ते मांडवी खुर्द व कातवडी बहुली तेथील रस्त्याच्या दोन्ही बाजूही वृक्षांनी बहरल्या होत्या.
मात्र, वृक्षतोडीमुळे रस्त्यासह परिसर उजाड बनला आहे. पावसामुळे तोडलेल्या वृक्षांच्या बुंध्यांना हिरवीगार पालवी फुटली आहे.
मांडवी बुद्रुकचे सरपंच सचिन पायगुडे म्हणाली, 'जीर्ण धोकादायक झाडे काढावीत. मात्र, रुंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या जुन्या वृक्षांना जीवनदान द्यावे.' सांगरुणचे माजी उपसरपंच विकी मानकर म्हणाले की, वृक्ष तोडण्यापूर्वी बांधकाम विभागाने योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळे ठेकेदाराने वारेमाप वृक्षांची कत्तल केली आहे.