आंबेगावच्या पूर्व भागात दुष्काळ! | पुढारी

आंबेगावच्या पूर्व भागात दुष्काळ!

लोणी धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात धामणी, लोणी, मांदळेवाडी, वडगावपीर, पहाडधरा, शिरदाळे परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शासनाने त्वरित जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उद्धव लंके, भगवान सिनलकर व परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

आता अधिक महिना संपण्याच्या मार्गावर असून, 17 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. असे असताना अद्यापही पावसाचा या भागात पत्ताच नाही. त्यामुळे या भागात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाने दांडी मारल्याने शेतकर्‍यांचा धीर खचला असून, सर्वसामान्य जनताही हवालदिल झाली आहे.

परिसरात पावसाने दडी मारल्याने गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी आणि पशुपालक टंचाईग्रस्त परिस्थितीचा सामना करत आहेत. जनावरांचा चारा व पाणी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. हा परिसर कायमच दुष्काळग्रस्त भाग असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक, वडगावपीरचे सरपंच मीरा संजय पोखरकर, धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, शिरदाळ्याचे माजी सरपंच मनोज तांबे, मयूर सरडे, पहाडधरा सरपंच राजश्री कुरकुटे व शेतकऱ्यांनी केली आहे.

पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण धोक्यात आला असून, परिसरातील विहिरी, ओढे, नाले, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. दुष्काळाने त्रस्त झालेल्या या भागातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जनावरांच्या चार्‍यासाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

टँकरच्या फेर्‍यांमध्ये वाढीची शक्यता

लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्याचे टँकर सुरू आहेत. जर पावसाने हजेरी लावली नाही, तर पाण्याच्या टँकरच्या फेर्‍या वाढवाव्या लागण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे.

हेही वाचा

नगर : भगवंताची सर्वांनी एकत्र आराधना करावी : माधवदास महाराज राठी

निपाणी : चारचाकीच्या धडकेत बोळावीचा वनकर्मचारी ठार; सहकारी गंभीर

नगरमधील रुईछत्तीशी परिसरात ऊस पीक नामशेष ! परिसरातील उसाचे उत्पन्न 10 वर्षांपासून घटले

Back to top button