नगरमधील रुईछत्तीशी परिसरात ऊस पीक नामशेष ! परिसरातील उसाचे उत्पन्न 10 वर्षांपासून घटले | पुढारी

नगरमधील रुईछत्तीशी परिसरात ऊस पीक नामशेष ! परिसरातील उसाचे उत्पन्न 10 वर्षांपासून घटले

रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील रुईछत्तीशी, गुणवडी, वाटेफळ, मठ पिंप्री, हातवळण, वडगाव, वाळकी गावातून उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. परंतु, गेल्या 10 वर्षांपासून या भागातील उसाचे उत्पन्न घटले आहे. उसाचे उत्पन्न घटल्याने अनेक शेतकर्‍यांचा आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. उसाच्या उत्पन्नावर या भागातील शेतकरी आर्थिक सुबत्तेने वाढत होता. गेल्या 10 ते 15 वर्षांपूर्वी पावसाचे असमान वितरण उसाच्या उत्पन्नास कारणीभूत ठरले. गावाकडील ओढे, नद्या उन्हाळ्यात तुडूंब वाहत होत्या, त्यामुळे या भागात उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. प्रवरानगर, श्रीगोंदा, घोडनदी या कारखान्यावर शेतकर्‍यांचा ऊस पाठवला जात होता; पण गेल्या 10 ते 15 वर्षांच्या तुलनेत उसाचे उत्पन्न 70 टक्क्याने घटले आहे. उन्हाळ्यात पाणी राहत असल्याने उसाचे उत्पन्न घेतले जात होते.

सध्या या भागात 100 हेक्टर उसाची लागवड करण्यात आली आहे. 15 ते 20 वर्षार्ंपूर्वी या भागात एक हजार हेक्टरच्या वर उसाची लागवड केली जात होती. आता, जनावरांच्या चार्‍यासाठी उसाची लागवड केली जाते. सुरुवातीला आर्थिक सुबत्तेसाठी ऊस पिकाकडे पाहिले जात होते.

‘हेक्टरी 70 टनही उत्पन्न होत नाही’
रुईछत्तीशी परिसरातून उसाचे उत्पन्न जवळपास नामशेष झाले आहे. पावसाचा लहरीपणा, दुष्काळ, शेती नापिक होण्याचे प्रमाण वाढल्याने उसाचे उत्पन्न घटले आहे. हेक्टरी 150 टन उसाचे उत्पन्न होत होते. आता, हेक्टरी 70 टनही उत्पन्न होत नाही. यावरून या भागात उसाचे क्षेत्र अनुकूल राहीले नाही. एकंदरीत पाण्याचा अभाव, दुष्काळाच्या झळा यामुळे उसाचे कोठार नामशेष झाले. एकेकाळी येथील प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतात ऊस लागवड केली जात होती; आता मात्र संपूर्ण शिवार ओसाड पडल्यासारखे दिसते. यावरून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुध्दा खालावली आहे.

हेही वाचा :

हुतात्मा पोलिस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार वेतन

चिखल तुडवत काढावी लागते वाट ; नगरसेवकांसह मनपाने लक्ष देण्याची मागणी

Back to top button