Maharashtra Election | शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढे ढकला, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू : चव्हाण | पुढारी

Maharashtra Election | शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढे ढकला, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू : चव्हाण

सिडको : पुढारी वृत्तसेवा- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक मतदारांना १४ जून पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी आहे. मतदानावर परिणाम होऊ शकतो. तरी शिक्षक मतदार संघाचे निवडणुक कार्यक्रम २० दिवस पुढे ढकलावे या मागणीचे निवेदन शिवसेना पक्ष व शिक्षक सेना या शिक्षक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांना विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, उपमहानगर प्रमुख निलेश साळुंखे, सुनील जाधव यांनी दिले .

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सर्व शिक्षक ही निवडणुकीच्या कर्तव्यावर ऑन ड्युटी असल्याने 20 तारखेपर्यंत निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे 15 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत त्यांना नामनिर्देशन पत्र भरायला शक्य होणार नाही. 22 मे ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शिक्षक मतदारांच्या उमेदवारी करण्याच्या घटनात्मक अधिकारा मध्ये अडथळा निर्माण होणारा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे.

सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक मतदारांना 14 तारखे पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सर्व शिक्षक हे पर्यटनासाठी व इतर कारणांसाठी बाहेर राज्यात व बाहेरगावी जाण्याचे नियोजित असते. अशावेळी 10 जूनला मतदान घेतल्यास मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होऊन मतदानाचा हेतू साध्य होणार नाही. शिक्षक मतदार संघ व लोकसभा निवडणूक दोन्ही कार्यक्रम एकमेकावर ओव्हरलॅप झालेला असल्याने मतदार व उमेदवारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. उमेदवारांची भूमिका शिक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवण्यासाठी कालावधी मिळणार नाही त्यामुळे भूमिका पोहोचणार नाही . विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत 7 जुलैपर्यंत असून वीस दिवस कार्यक्रम पुढे ढकलल्यास 30 जून पर्यंत सर्व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुयोग्य पद्धतीने होऊ शकते. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभागाच्या वतीने शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निलेश साळुंखे व सुनील जाधव यांच्यासमवेत निवेदन देण्यात आले. त्याची प्रत राष्ट्रीय मुख्य निवडणूक आयोगाकडे आणि राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. निवडणुक कार्यक्रम पुढे न ढकलल्यास संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याबाबतीत दाद मागितली जाईल असे शिक्षक सेनेच्या वतीने विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले आहे .

हेही वाचा

Back to top button