नगर : भगवंताची सर्वांनी एकत्र आराधना करावी : माधवदास महाराज राठी | पुढारी

नगर : भगवंताची सर्वांनी एकत्र आराधना करावी : माधवदास महाराज राठी

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : समाजात कर्तव्य प्राप्तीची जाणीव राहिली नाही, यांचा परिणाम वाईट होत आहे. म्हणून घरातील सर्वांनी दिवसातून एक वेळ न चुकता भगवंतांचे चिंतन केल्यास मन प्रसन्न राहते, असे सांगत ठरवून दिवसातून सर्वांनी एकत्र येत भगवंताची आराधना करावी, असा सल्ला शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात शिवपुराण कथेचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी गगनगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रमेशराव माने, गोविंदराव माने, मारोतीराव माने, लक्ष्मण माने, किसन बनकर, पोराईट कंपनीचे कार्यकारी संचालक संदीप फटांगरे, बिपीन देशमुख, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे, संजय महाराज देशमुख, बाळू महाराज, आबासाहेब थोरात, कपिल पवार, नवनाथ आगलावे, विठ्ठलदास असावा, बाळासाहेब देशमुख, किसन पानसरे, नितीन पानसरे, सुदीप वाकळे, सागर वाघचौरे, प्रमोद देशमुख, ज्ञानेश्वर वाघचौरे, सुभाष रहाणे आदी उपस्थित होते. राठी म्हणाले, संसार विश्वासावर अवलंबून असतो, पती-पत्नीत विश्वास नसेल तर एकमेकांवर केलेल्या कृतीबद्दल विश्वास राहणार नाही. तो विश्वास परस्परांनी टिकवायचा असतो. जर असे होत नसेल तर संसार कधीच टिकत नाही. पती ज्ञानी आहे, यावर विश्वास ठेवा. जास्त चिकित्सा करीत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

संध्याकाळी आपण टीव्ही पाहण्यात वेळ घालवतो. कधी मुलांनासोबत घेऊन त्यांच्यावर संस्कार करा. आज समाजात जे चित्र निर्माण झाले आहे ते विचित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी भगवंतांची आराधना करणे आवश्यक आहे. घरात सर्वांनी दिवसातून एकदा दररोज नियमपूर्वक पाच मिनिटे आराधना करावी. आज संस्कार राहिले नाही. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळी पाच- सहा भाऊ, चार- पाच बहिणी असत. हळू-हळू तो विषय संपत आहे.

ज्याला वाटेल त्याच्याबरोबर जायचं, जितक्या दिवस रहायचे तितक्या दिवस रहायचं, म्हणजे ‘लिव्ह इन’ आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात भावनांना अस्तित्व राहिले नाही. अजून 30 वर्षानंतर नाते संपलेले असेल. भावाची मुले 4 दिवस आमच्याकडे आली तर डोक्याला आठ्या पडतात. कोणी एकमेकांना सांभाळायला तयार नाही, ही आमची मनोवृत्ती फार वाईट आहे, असे सांगत जेथे आत्मीय संबंध राहिला नाही, तो समाज उभा राहु शकत नाही, असे ते म्हणाले.

नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले पुन्हा गावाकडे येण्याचा विचार करीत नाही. काही आले तर ते आपल्याला अक्कल शिकवायला येतात. आपला हिस्सा गुंडाळून घ्यायला येतात. बाकी त्यांना कशाचे घेणे- देणे नसते. आपण एकदा आमच्या कपाळी गंध लावायचा म्हटल तर नको वाटते. थोडा विचार करा. कधी आम्ही जीवनात कधीच गोसेवा केली नाही. गाईला पशु समजून उत्पन्नाचे साधन समजलो अन् आमची शेती बिघडली, असे सांगत माधवदास महाराज राठी म्हणाले, सद्गुरू गंगनगिरी महाराजांनी अनेक लोक घडवले. त्यांची उपासना व साधना केली पाहि

जे. किती वर्षांनंतर खर्‍या अर्थाने किती जणांना गगनगिरी महाराज कळाले, याचा प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
घरात दररोज सगळ्यांनी एकदा एकत्र येऊन जेवणाची वेळ एकच ठेवा. सगळ्यांनी त्यावेळी एकत्र येऊन एका ठिकाणी हसत- खेळत आनंदाने जेवण करा. यातून परस्परांचे असणारे एकमेकांविषयीचा सद्भाव अधिक वाढेल. मोबाईलचा आमच्यावर एवढा परिणाम झाला की, आम्ही कुठल्या दिशेला चाललो, हेही सांगता येत नाही. शिवकथा लवकर होत नाही. स्वतः भगवान शिवांना सांगितलेली ही कथा श्रवणाचा योग येत नाही.

पर्यावरणाचा संदेश द्यावाः शालिनीताई देशमुख
महिलांनी एक काम मागे राहिले तरी चालेल, मात्र मुला-मुलींवर चांगले संस्कार करा. सासू- सासर्‍यांसह सर्वांशी आपुलकीचे नाते जपा. प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे. आपण पावसाळ्यात झाडे लावतो उन्हाळ्यात ते जळून जातात. या सप्ताहातून पर्यावरणाचा संदेश द्या. आपल्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी झाडे लावा आणि ती जगवा. प्रत्येकाने आई-वडिलाचा आदर्श घ्यावा, असा मौलिक सल्ला समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यांनी यावेळी दिला.

हेही वाचा :

Rishabh Pant : पंत मैदानात उतरेल पण विकेटकीपिंगला मुकणार! मोठी अपडेट समोर

UFO : उडत्या तबकड्यांचे रहस्य

Back to top button