निपाणी : चारचाकीच्या धडकेत बोळावीचा वनकर्मचारी ठार; सहकारी गंभीर | पुढारी

निपाणी : चारचाकीच्या धडकेत बोळावीचा वनकर्मचारी ठार; सहकारी गंभीर

निपाणी : पुढारी वृत्तसेवा निपाणी-मुरगुड मार्गावर गायकवाडीनजीक दुचाकीला दूध वाहतूकीच्या बोलेरो वाहनाची समोरून धडक बसली. या अपघातात वनकर्मचारी जागीच ठार झाला. शंकर ईश्वर पसारे (वय-55) रा.बोळावी (ता. कागल) जि.कोल्हापूर असे मृत झालेल्याचे नाव आहे. तर दुचाकीवर मागे बसलेले त्यांचे सहकारी रवींद्र ज्ञानदेव पोवार (वय 55) रा.हणबरवाडी (ता.कागल) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. दरम्यान अपघातानंतर बोलेरो वाहन चालकाने पळ काढला. घटनेची नोंद शहर पोलिस स्‍टेशन मध्ये झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत दुचाकीस्वार शंकर व जखमी रवींद्र हे दोघेजण वनखात्यात सेवेत आहेत. दोघेजण शनिवारी कोल्हापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खात्याची बैठक संपवून दोघेजण आपल्या मूळगावी गावाकडे जात होते. त्यांची दुचाकी गायकवाडी येथे आली असता, समोरून वेगात येणाऱ्या दूध वाहतूक बोलेरो पिक-अप वाहन चालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात शंकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी रवींद्र हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान अपघातानंतर बोलेरो वाहन चालकाने पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले व जखमी रवींद्र यांना येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. घटनास्थळी सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी केली व फरार बोलेरो वाहन चालकाचा शोध घेतला. मृत पसारे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button