पुणे : ‘त्या’ दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; हॉटेल वैशालीसह अन्य व्यवहारांचे केले कुलमुखत्यारपत्र | पुढारी

पुणे : 'त्या' दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; हॉटेल वैशालीसह अन्य व्यवहारांचे केले कुलमुखत्यारपत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वैशाली हॉटेलसह अन्य व्यवहारांचे कुलमुखत्यारपत्र करण्यासाठी शिकारीची बंदूक हवेत झाडून वहिनीवर दबाव टाकणार्‍या दिराचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अभिजित विनायकराव जाधव (वय 40, रा. आरंभ अपार्टमेंट, घोले रस्ता) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला. याबाबत, 34 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

6 डिसेंबर 2011 रोजी घोले रस्ता येथील घरी असताना सासू, सासरे, दीर व नवरा यांनी कुलमुखत्यारपत्रासाठी दबाव आणला. या वेळी जाधव हा त्याच्या शिकारीची बंदूक साफ करताना बंदुकीचा पॉईंट माझ्याकडे करून आवाज काढत होता. या वेळी कुलमुखत्यारपत्रासाठी नकार दिल्यानंतर अभिजितने मला पकडून दबाव आणला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी जाधव याने न्यायालयात अर्ज केला.

त्यास सरकारी वकील विश्वास सातपुते यांसह मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. शिओम पंडित, अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी व अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी विरोध केला. आरोपीने बंदुकीच्या धाक दाखविल्यामुळे पीडितेने कुलमुखत्यारपत्र तयार केले आहे. पीडितेचा पती गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून, त्याचा शोध घ्यायचा आहे. पीडितेचे कोट्यवधींचे दागिने गहाळ झाले आहेत, त्यांचा शोध घ्यायचा आहे. पीडिता या एकुलत्या एक असून, त्यांना कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपींनी पूर्वनियोजन करून हा कट रचला असून, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जाधव याचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, अशी विनंती अ‍ॅड. कुलकर्णी, अ‍ॅड. पंडित, अ‍ॅड. पिसाळ यांसह सरकार पक्षाने केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

हेही वाचा

खडकवासला धरणात गत वर्षीपेक्षा 11 टक्के जादा पाणी

गोवा : वेर्ण्यात युवतीला बेशुद्ध करून अत्याचाराचा प्रयत्न

चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्यास वृत्तपत्रांवर हक्कभंग : उपमुख्यमंत्री फडणवीस

Back to top button