खडकवासला धरणात गत वर्षीपेक्षा 11 टक्के जादा पाणी | पुढारी

खडकवासला धरणात गत वर्षीपेक्षा 11 टक्के जादा पाणी

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गतवर्षीपेक्षा जवळपास तीस टक्के पाऊस कमी पडला आहे. तरीही चार धरणांच्या साखळीत गतवर्षीच्या तुलनेत 11 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या प्रकल्पात 24.46 टीएमसी (83.92 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.

गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी धरणसाखळीत 21.24 टीएमसी 72.88 टक्के इतके साठा होता. चार धरणांच्या साखळीची पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत खडकवासला येथे 420 मिलिमीटर, पानशेत येथे 1458, वरसगाव येथे 1425 आणि टेमघर येथे 1710 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. यंदा मात्र या कालावधीत खडकवासलात 278, वरसगाव येथे 1131, पानशेत येथे 1123 आणि टेमघर येथे 1710 मिलिमीटर इतका पाऊस पडला.

टेमघर वगळता इतर तीनही धरण क्षेत्रात जवळपास तीस टक्के कमी पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या टेमघर येथे 9 मिलिमीटर, वरसगाव येथे 3, पानशेत येथे 2 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर
पाऊस पडला.

गतवर्षीपेक्षा यंदा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. जून महिना जवळपास कोरडा गेला. पानशेत, वरसगावच्या धरण माथ्यापेक्षा धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रायगड जिल्ह्यालगतच्या खोर्‍यात अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी होऊनही गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत अधिक पाणीसाठा आहे.

-मोहन भदाणे,
उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

हेही वाचा

मुंबई : शासकीय रुग्णालयांत सर्वांना मोफत उपचार

राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरणार

नागपूर : सव्वा कोटी लुटणारे दोन आरोपी गजाआड

Back to top button