रायबरेलीत पुन्हा प्रियांका यांची जादू चालणार काय? | पुढारी

रायबरेलीत पुन्हा प्रियांका यांची जादू चालणार काय?

रशीद किडवाई

राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची देशभर भरपूर चर्चा झाली. सध्या असा प्रश्न विचारला जात आहे की, भगिनी प्रियांका गांधी-वधेरा यांची जादू रायबरेलीत चालणार काय? 1999 मध्ये त्यांच्या एका तडाखेबंद भाषणाने सारे चित्र पालटले होते आणि काँग्रेसचे उमेदवार कॅ. सतीश शर्मा यांनी भाजपचे उमेदवार अरुण नेहरू यांना धूळ चारली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी यावेळी राहुल गांधी यांच्यासाठी त्या करणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे.

खरेतर बोफोर्स प्रकरणामुळे नव्वदच्या दशकात काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. त्यावेळी राजीव गांधी यांचे चुलतभाऊ अरुण नेहरू यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपच्या तिकिटावर रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरविले होते. अरुण नेहरू त्या आधी राजीव यांच्या मंत्रिमंडळात कार्यरत होते. तथापि, काँग्रेस पक्ष अडचणीत आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एवढेच नव्हे तर रायबरेलीतून आपली जागाही पक्की केली होती. त्यावेळी म्हणजे 1999 मध्ये प्रियांका यांनी जोरदार भाषण करून अरुण यांच्या फंदफितुरीवर कोरडे ओढले होते. त्यामुळे चित्र पालटले आणि कॅ. शर्मा यांनी अरुण यांच्यावर दणदणीत मतांच्या फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे अरुण यांच्या प्रचारासाठी तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेही रायबरेलीत दाखल झाले होते. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अरुण यांच्या प्रचारार्थ प्रभावी भाषण केले.

मात्र, तोपर्यंत अरुण यांच्या पराभवावर जनतेने शिक्कामोर्तब केले होते. प्रियांका तेव्हा म्हणाल्या होत्या, माझे काका अरुण यांना काँग्रेसने मंत्री बनवले. मात्र, पक्ष अडचणीत आला तेव्हा त्यांनी पळ काढला. पक्षाच्या पाठीत सुरा खुपसणार्‍या व्यक्तीला तुम्ही विजयी करणार काय? त्यानंतर क्षणार्धात जनतेतून ‘नाही-नाही’ असा पुकारा झाला. या घटनेला आता जवळपास पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत.

दरम्यानच्या काळात 2019 मध्ये काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगड या राज्यांत विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला. त्यामुळे पक्षात चैतन्याची लाट आली. त्याच वर्षी प्रियांका यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर त्यांच्या सहकारी नेत्यांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पर्यायी नेतृत्व म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपने त्यावर संयमी भूमिका घेतली. पाठोपाठ लोकसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लखलखीत यश मिळवले. त्या निवडणुकीत प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. मात्र, काँग्रेसचा जनाधार घटल्यामुळे त्यांना त्या निवडणुकीत फार काही करून दाखविता आले नव्हते. यावेळी त्या राहुल गांधी यांच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. सध्या त्यांच्या प्रचारसभांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. परिणामी, प्रियांका यांच्या प्रचाराचा लाभ राहुल यांना होऊ शकतो.

Back to top button