कोल्‍हापूर : परिते येथे रस्‍ता ओलांडताना भरधाव लक्झरी बसच्या धडकेत महिलेचा मृत्‍यू | पुढारी

कोल्‍हापूर : परिते येथे रस्‍ता ओलांडताना भरधाव लक्झरी बसच्या धडकेत महिलेचा मृत्‍यू

कौलव; पुढारी वृत्तसेवा परिते ता. करवीर येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्यामुळे अंजनी रंगराव पाटील (वय 77) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास अंजनी पाटील या काही कामानिमित्‍त जात होत्या. परिते बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणाऱ्या लक्झरी बसने (क्रमांक टी एस १२ यु इ ०३८२)त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या.

गावच्या प्रवेशद्वारातच अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली मात्र ग्रामस्थांनी ये जा करणाऱ्या वाहनांना एकेरी मार्ग रिकामा करून दिला. भीषण अपघातात वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत होते.

Back to top button