मध्य प्रदेशात काँग्रेस आव्हान देण्याच्या तयारीत | पुढारी

मध्य प्रदेशात काँग्रेस आव्हान देण्याच्या तयारीत

सुनील डोळे

मध्य प्रदेशात पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आता उमेदवार आणि मतदारांना तिसर्‍या टप्प्याचे वेध लागले आहेत. या राज्यात लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत. त्यातील दोन टप्पे पार पडले आहेत. तिसर्‍या टप्प्यात 7 मे रोजी मुरेना, भिंड, ग्वाल्हेर, गुणा, सागर, विदिशा, भोपाळ आणि राजगढ या आठ मतदार संघांत मतदान झाले आहे. या आठही मतदार संघांत काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार उभे केल्यामुळे सर्व लढती रंगतदार होतील, अशी अपेक्षा आहे. त्यातील गुणा, विदिशा आणि राजगढ या हायप्रोफाईल लढतींकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशात यावेळी भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत निकराची लढत अपेक्षित आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केला, तर त्यामध्ये ओबीसींची संख्या 50 टक्के, अनुसूचित जमाती 20 टक्के, अनुसूचित जाती 15 टक्के आणि उच्चवर्णीय 15 टक्के असे प्रमाण आहे. यातील ओबीसी समाज भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. याखेरीज उच्चवर्णीय आणि मागासवर्गीयांची मते भाजपला मिळत आली आहेत. आधी हा वर्ग काँग्रेसचा मतदार मानला जात होता. मात्र, असे असले तरी यावेळी भाजपला ही निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिलेले नाही. काँगे्रसने मातब्बर उमेदवार दिल्यामुळे भाजपला जोरदार मेहनत घ्यावी लागत आहे. यावेळी जितू पटवारी यांच्यासारख्या हिकमती नेत्याकडे काँग्रेसला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचे मार्गदर्शन ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.

विधानसभा निवडणुकीत स्वीकारावा लागलेला पराभव विसरून काँग्रेसचे सामान्य कार्यकर्तेही जोमाने काम केले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला छिंदवाडा या एकमेव मतदार संघातील विजयावर समाधान मानावे लागले होते. यावेळी आणखी काही जागा पदरी पडतील, अशा पद्धतीने काँग्रेसने व्यूहरचना केली आहे. उमेदवारी देताना जातीय समीकरणांचे गणितही काँग्रेसकडून सांभाळले गेल्याचे दिसून येते. त्याचा फायदा त्या पक्षाला होऊ शकतो. दुसरीकडे, साधनांची रेलचेल, मजबूत पक्ष संघटना आणि लोकप्रिय योजनांमुळे मतदारांचा मिळणारा प्रतिसाद या गोष्टी भाजपसाठी जमेच्या ठरल्या आहेत.

गुणामध्ये निकराची लढत

ज्योतिरादित्य शिंदे गुणा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने राव यादवेंद्र सिंह यांना मैदानात उतरवले आहे. या मतदार संघात यादव समाजाची मते निर्णायक मानली जातात. त्यामुळे शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांच्यासाठी खास प्रचारसभा घेतली आणि मतदारांना शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. शिंदे यांना आव्हान दिलेले राव यादवेंद्र सिंह हे मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. कधी काळी ते जनसंघाचे कार्यकर्ते होते आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची भिस्त प्रामुख्याने यादव मतदारांवर आहे.

विदिशा मतदार संघातून 1991 पासून तब्बल पाच वेळा शिवराजसिंह चौहान ऊर्फ मामा यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्यासाठी हा मतदार संघ नवा नाही. त्यांचा प्रचारही जोमात सुरू आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रताप भानू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तेही कसलेले नेते आहेत. राजगढ मतदार संघात काँग्रेसचे 77 वर्षीय दिग्विजय सिंह मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपचे विद्यमान खासदार रोडमल नागर यांच्याशी दोन हात करायचे आहेत. ही लढत चुरशीची होईल, असा अंदाज आहे.

Back to top button